Twitter Down : X वर सायबर हल्ल्याचा मस्क यांचा दावा, युक्रेनशी कनेक्शन का?

Twitter Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स सोमवारी अचानक डाऊन झालं. त्यामुळे अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्यामते ही टेक्निकल समस्या नाही, तर हा सायबर हल्ला होता.

Twitter Down : X वर सायबर हल्ल्याचा मस्क यांचा दावा, युक्रेनशी कनेक्शन का?
Elon Musk
| Updated on: Mar 11, 2025 | 9:06 AM

सोशल मीडिया प्लेटफॉर्म X (ट्विटर) सोमवारी डाऊन होतं. अनेक युजर्सनी एक्स हाताळताना अडचणं येत असल्याची तक्रार केली. अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेक्निकल कारणांमुळे डाऊन होतात. पण एक्सच्या मालकाच यापेक्षा वेगळं मत आहे. X चे मालक इलॉन मस्क यांनी सोमवारी X च्या डाऊन होण्यासाठी शक्तीशाली सायबर हल्ला कारणीभूत असल्याच म्हटलं आहे.

इलॉन मस्क म्हणाले की, “आम्ही दर दिवशी सायबर हल्ल्याचा सामना करतो. पण यावेळी यामध्ये बरेच रिसोर्सेस वापरण्यात आले आहेत. यामध्ये कुठला तरी संघटित समूह किंवा कुठलातरी देश सहभागी आहे” बरेच रिसोर्सेसचा अर्थ मस्क यांनी स्पष्ट केला नाही. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार सायबर सुरक्षा एक्सपर्टनी मस्कच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. त्यांनी म्हटलय की, अशा प्रकारच्या हल्ल्यांना डिनायल ऑफ सर्विस (DoS) म्हटलं जातं. असे हल्ले छोटे समूह किंवा व्यक्तीगत पातळीवर सुद्धा केले जाऊ शकतात.

DoS हल्ला काय असतो?

Downdetector नुसार, अमेरिकेत जवळपास 39,021 यूजर्स सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास X चा वापर करु शकले नाहीत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत केवळ 1500 युजर्सना एक्सवर समस्या येत होती. रॉयटर्सच्या रिपोर्ट्नुसार, इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की, X वर अनेकदा डिनायल ऑफ सर्विसचा (DoS) सामना करावा लागला आहे. DoS हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट ट्रॅफिक पाठवून वेबसाइट ठप्प केली जाते. हा भरपूर मोठा हाय-टेक हल्ला नसतो, पण त्यामुळे भरपूर नुकसान होतं.

मस्क यांनी काय म्हटलय?

फॉक्स बिजनेस नेटवर्कच्या रिपोर्ट्नुसार, इलॉन मस्क यांनी दावा केलाय की, हा सायबर हल्ला युक्रेनच्या क्षेत्रातील IP एड्रेसवरुन झालाय. इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीने हा दावा फेटाळून लावलाय. अलीकडेच मस्क बोलले होते की, युक्रेनमध्ये त्यांची Starlink सॅटलाइट सेवा नसेल, तर युक्रेनची फ्रंटलाइन कोसळून जाईल.