Russia And Ukraine War : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला, 4 एअर बेस उडवले, 40 विमानं ध्वस्त

युक्रेनने रशियावर अनेक ड्रोन हल्ले केल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

Russia And Ukraine War : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला, 4 एअर बेस उडवले, 40 विमानं ध्वस्त
ukraine attack russia
| Updated on: Jun 01, 2025 | 9:16 PM

Russia And Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेलं नाही. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. एकीकडे शांततेसाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले करताना दिसत आहेत. दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार युक्रेनने रशियाच्या चार महत्त्वाच्या हवाई तळांवर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता रशियादेखील प्रत्युत्तरादाखल मोठे हल्ले करण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक मोठा ड्रोन हल्ला

युक्रेनने रशियाचे ओलेन्या, बेलाया या हवाई तळांवर थेट हल्ला केला आहे. या हल्ल्यांसाठी युक्रेनने ड्रोनची मदत घेतली आहे. ज्या ठिकाणी युक्रेनने हे हल्ले केले आहेत, ती ठिकाणी रशिया-युक्रेनच्या सीमेपासून फार दूर आहेत, अशी माहिती आहे. युक्रेनमधील माध्यमांनुसार युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांमधील सर्वाधिक मोठा ड्रोन हल्ला आहे. रशिया ज्या ठिकाणाहून युक्रेनला लक्ष्य करत होते त्याच ठिकाणांवर युक्रेनने ड्रोन हल्ले केले आहेत.

40 पेक्षा जास्त बॉम्बर्स ध्वस्त

या हल्ल्यानंतर युक्रेनने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियातील काही हवाई तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत 40 पेक्षा जास्त बॉम्बर्सना युक्रेनने ध्वस्त केलं आहे. याच बॉम्बर्सचा उपयोग युक्रेनवर हल्ला करण्यासाठी केला जात होता. मरमंस्कमधील ओलेन्या हवाई तळ, इरकुत्स्कमधील बेलाया एयर बेस, इवानोवो येथील इवानोवो हवाई तळ तसेच डायगिलेवो अशा एकूण चार हवाई तळांना लक्ष्य केलं आहे.

रशियाची कोणत्या विमानांवर हल्ला

युक्रेनच्या सुरक्षा सेवेने दिलेल्या माहितीनुसार या ह्ल्ल्यांत रशियाची Tu-95, Tu-22 यासारखी मोठी बॉम्बर्स विमानं तसेच दुर्मिळ आणि महागडे A-50 जासुसी विमानांना ध्वस्त करण्यात आलं आहे.

अद्याप रशियाची कोणतीही प्रतिक्रिया नाही

दरम्यान, या हल्ल्याची पुष्टी अद्याप रशिया किंवा अन्य देशांनी केलेली नाही. त्यामुळे युक्रेनच्या या कथित हल्ल्याच्या दाव्यावर रशिया नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच युक्रेनने हे हल्ले खरंच केले असतील तर उत्तरादाखल रशिया नेमकी काय कारवाई करणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.