
लष्करी घेराबंदी, धमक्या आणि इशाऱ्यानंतर अखेर अमेरिकेने वेनेजुएलावर हल्ला केला आहे. अमेरिकेने वेनेजुएलाची राजधानी काराकासमधील मोठ्या मिलिट्री बेसवर हल्ला केला आहे. काराकासमध्ये नेवी बेसवर हल्ला केला आहे. पेंटागनने नेवीबेसला टार्गेट केलं. शनिवारी मध्यरात्री 2 च्या सुमारासा वेनेजुएलाची राजधानी काराकास येथे कमीत कमी सात स्फोटाचे आवाज ऐकू आले. शहरातून धुराचा लोळ उठताना दिसला. वेनेजुएलाच्या संरक्षण मंत्र्यांच घर आणि मिलिट्री बेसला टार्गेट करण्यात आलं आहे. Sky News Arabia ने असा दावा केला आहे. सीएनएनच्या एका टीमला शनिवार रात्री वेनेजुएलाची राजधानी काराकासमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू आले. पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार, रात्री 1:50 च्या सुमारास झाला.
सीएनएनची पत्रकार ओसमारी हर्नांडेजने सांगितलं की, हा स्फोट इतका जोरदार होता की, माझ्या रुमची खिडकी हलली. स्फोटानंतर काराकासच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. यावेळी विमानं हवेत उडताना दिसली.
लोक आपल्या घरातून बाहेर रस्त्यावर आले
वेनेजुएला सरकारने तात्काळ या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्फोटाचे आवाज ऐकू येताच शहराच्या अनेक भागात लोक आपल्या घरातून बाहेर रस्त्यावर आले. काराकासमध्ये वेगवेगळ्या भागात दूर-दूरपर्यंत लोक रस्त्यावर उभे होते. सध्या अमेरिका आणि वेनेजुएलामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आहे. वेनेजुएलावर जमिनी हल्ले होऊ शकतात असा इशारा ट्रम्प यांनी आधीच दिला होता.
30 हल्ल्यात 107 लोकांचा मृत्यू
अमेरिकन सैन्याने कॅरेबियन समुद्र आणि पूर्व प्रशांत महासागरात अनेक नौकांवर हल्ले केले. त्यांच्यावर ड्रग्स तस्करीचा आरोप केला. अमेरिकी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, समुद्री अभियानात आतापर्यंत केलेल्या 30 हल्ल्यात 107 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वेनेजुएलाची बाजू काय?
वेनेजुएलामध्ये जमिनी कारवाई होऊ शकते असं ट्रम्प यांनी वारंवार म्हटलं आहे. म्हणजे अमेरिका त्यांचं सैन्य वेनेजुएलामध्ये घुसवू शकतं. मादुरो यांच्यावर सत्ता सोडण्यासाठी ट्रम्प प्रशासन दबाव टाकत आहे. त्यासाठी त्यांनी वेनेजुएलावर कठोर प्रतिबंध लादले आहेत. मादुरो यांनी कुठल्याही गुन्हेगारीशी संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला. मला सत्तेवरुन हटवून अमेरिकेचा वेनेजुएलाच्या मोठ्या तेल साठ्यावर आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा आहे असं मादुरो यांचं म्हणणं आहे.
CIA ला काय परवानगी दिलेली?
अमेरिकेची वेनेजुएलातील कथित ड्रग तस्करी नेटवर्क विरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरु आहे, असा इशारा ट्रम्प यांनी आधी दिला होता. ऑक्टोंबर महिन्यात ट्रम्प म्हणाले की, त्यांनी CIA ला वेनेजुएलाच्या आत काम करण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरुन तिथल्या ड्रग्स तस्करीला रोखता येईल.