
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदीची अमेरिकेने घोषणा केली. मात्र, अमेरिकेच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नक्की काय आहे हे कळत नाहीये. युद्धात डोनाल्ड ट्रम्प एकटे पडल्याचे दिसत आहे. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने जगातील तेल पुरवठा जवळपास ठप्प झाल्याचे बघायला मिळाले. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. भारताच्या मदतीला अनेक देश पुढे आले. भारतात स्थिती नियंत्रणात असून कच्च्या तेलाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. भारतात एलपीजी गॅसचे जहाज कसे जास्तीत जास्त येतील, याकरिता भारत प्रयत्न करत आहे. हेच नाही तर भारत सध्याच्या घडीला इराणकडूनही एलपीजी गॅसची खरेदी करत आहे. भारताची या युद्धात भूमिका अगदी स्पष्ट आहे. कोणत्याही स्थितीत युद्ध रोखले पाहिजे, असे भारताकडून वारंवार सांगितले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर संवाद दोन दिवसांपूर्वीच झाला. यादरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करण्यात आले. संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मिळून कोणत्याही समस्येतून मार्ग काढू शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक नरेंद्र मोदी यांची आठवण झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. भारतातील अमेरिकी दूतावास यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मेसेज देत म्हटले की, भारतासोबत आमचे जुने संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी आम्ही दोघे असे आहोत, जे कोणत्याही समस्येतून मार्ग काढू शकतात.
यापेक्षा दुसरे काही बोलण्याची अजिबात गरज नाही. मंगळवारीच डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना नक्की कोणत्या समस्येतून नरेंद्र मोदी यांच्यासोबत मिळून मार्ग काढायचा आहे हे कळू शकले नाही. मध्य पूर्वेत कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतता असायला हवी, ही भारताची भूमिका आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांची आठवण आली.