ट्रम्प यांच्यासोबत वाद, मग एक दिवसात बदलला खेळ, एलॉन मस्क यांनी बनवला स्वतःचा राजकीय पक्ष
मस्क यांनी एक्स वर नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या एक्स पोस्टमध्ये अलिकडच्या सर्वेक्षणाच्या निकालांचा हवाला देत त्यांनी लिहिले की, आज तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी अमेरिका पार्टीची स्थापना करण्यात आली आहे.

Elon Musk New Party: अमेरिकेतील राजकारणात नवीन ट्विस्ट आला आहे. अब्जाधीश आणि टेस्ला-स्पेसएक्स सारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार आहे. मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर केली आणि तीही फक्त एकाच दिवसात.
‘अमेरिका पार्टी’ ची स्थापना
अमेरिकेच्या २४९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित ‘वन बिग ब्युटीफुल’ कायदा लागू केला आहे. त्याच विधेयकावरुन एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली. हे विधेयक लागू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी एलॉन मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ नावाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, हा पक्ष अमेरिकेतील लोकांना एकपक्षीय व्यवस्थेतून मुक्त करेल. मस्क यांच्या या घोषणेनंतर अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे.
मस्क यांनी एक्स वर नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या एक्स पोस्टमध्ये अलिकडच्या सर्वेक्षणाच्या निकालांचा हवाला देत त्यांनी लिहिले की, आज तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी अमेरिका पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात जनतेने २:१ च्या प्रमाणात नवीन राजकीय पर्यायाची इच्छा व्यक्त केली, असा दावा एलॉन मस्क यांनी करत नवीन राजकीय पक्ष निर्माण केला.
पोलमध्ये १२ लाख जणांचा सहभाग
४ जुलै रोजी म्हणजेच अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी एलॉन मस्क यांनी X वर एक पोल पोस्ट केला होता. त्यात म्हटले होते की, तुम्हाला द्विपक्षीय व्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवे आहे का? या पोलमध्ये १२ लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आणि बहुसंख्य लोकांनी होय असे उत्तर दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मस्क यांनी आपला पक्ष बनवला. अमेरिकेत सध्या रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक असे दोन पक्ष आहे. आता एलॉन मस्क यांनी तिसरा पक्ष तयार केला आहे.
कधी मित्र, आता राजकीय वैर
एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कधीकाळी खूप चांगली मैत्री होती. एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात लाखो डॉलर्स खर्च केले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे प्रमुख म्हणून एलॉन मस्क यांची निवड केली होती. या विभागाचा उद्देश सरकारी खर्च कमी करणे हा होता. परंतु ‘वन बिग ब्युटीफुल’ या विधेयकावरुन दोघांमध्ये संघर्ष सुरु झाला आणि मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली.