
अमेरिका अत्याधुनिक F-35 फायटर जेट्सची सौदी अरेबियाला विक्री करणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा धोरणात झालेला हा मोठा बदल आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा प्रादेशिक सुरक्षेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे इस्रायली आणि भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान व्हाइट हाऊसमध्ये येण्याच्या एकदिवस आधी 17 नोव्हेंबर ओव्हल ऑफिसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आम्ही हे करणार आहोत, सौदी अरेबियाला F-35 जेट्स देणार आहोत’ असं जाहीर केलं. या विक्रीमुळे जे संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतात, त्या बद्दल पेंटागॉनमधील इंटेलिजन्स अधिकारी आणि मित्र देशांनी आपली चिंता व्यक्त केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन अमेरिका हा व्यवहार करणार आहे.
लॉकहीड मार्टिन कंपनीने F-35 फायटर जेट्सची निर्मिती केली आहे. अब्जावधी डॉलर्सचा हा व्यवहार आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेला 48 F-35 जेट्स देण्याची विनंती केली आहे. पाचव्या पिढीचं फायटर विमान बाळगणारा सौदी अरेबिया पहिला देश ठरणार आहे. हे स्टेल्थ जेट आहे. म्हणजे F-35 आकाशात असताना जवळपास अदृश्य असतं. शत्रूच्या रडारला हे विमान पकडता येत नाही. तीच या विमानाची सर्वात मोठी खासियत आहे. असं शस्त्र सौदी अरेबियाच्या हाती आलं, तर इस्रायल आणि भारत दोन्ही देशांसाठी मोठा धोका आहे. सध्या मध्य पूर्वेमध्ये F-35 विमाने ऑपरेट करणारा इस्रायल एकमेव देश आहे.
भारताला धोका काय?
मिडल ईस्टमध्ये इस्रायल एक मोठी लष्करी ताकद आहे. त्यांचं लष्करी वर्चस्व, महत्व कमी होऊ द्यायचं नाही हे अमेरिकेच धोरण आहे. त्यामुळे इस्रायलचा या व्यवहारावर आक्षेप आहे. भारताने या व्यवहारावर चिंता व्यक्त करण्याचं कारण म्हणजे अलीकडे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन देशात झालेला करार. या करारानुसार कुठल्याही एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. म्हणजे उद्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, तर सौदी अरेबियाला F-35 फायटर जेट्सचा वापर करता येईल. हा भारतासाठी मोठा धोका आहे. म्हणून भारताने सुद्धा अमेरिकेच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे घनिष्ठ संबंध आहेत. सौदीला लष्करी दृष्टया बळकट करु नये अशी इस्रायलची सुद्धा इच्छा आहे.