
India-US Relation : अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सध्या ताणलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या उन्मादामुळे भारत-अमेरिका संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. सध्या 25 टक्के कर लागू आहे. तर उर्वरित 25 टक्के अतिरिक्त कर हा 27 ऑगस्टपासून लागू होईल. पण त्याआधीच अमेरिकेला इशारे मिळू लागले आहेत. जगभरातून तर टॅरिफच्या या निर्णयाचा निषेध होत आहे, अनेकांनी त्यावर नाराजील व्यक्त केली आहेच, पण याच मुद्यावरून ट्रम्प यांना देशांतर्गतही नाराजीचा सामना करावा लागत आहे. (टॅरिफचा) हा निर्णय घेऊ नये असा इशारा देशातील लोकंच ट्रम्पना देत आहे.
एवढंच नव्हे तर भारतावर कर लादण्यास चीनने तीव्र विरोध केला आहे. मौन बाळगल्याने केवळ गुंडगिरीला बळ मिळतं असंही चीनने म्हटलं आहे. विशेष म्हणजे चीनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा निक्की हेली यांनी स्वतःच डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आहे.
खरं तर, डोनाल्ड ट्रम्प आता टॅरिफमुळे घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वेढले गेले आहेत. एकेकाळी संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निक्की हेली यांनी स्पष्टपणे म्हटले की, जर भारत आणि अमेरिकेतील व्यापार वाद वाढला तर त्याचे रूपांतर मतभेदात होईल. आणि जर असं झालं तर ती एक मोठी चूक असेल, असंही त्यांनी म्हटलं. एकाप्रकाररे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशाराचा दिला की, अमेरिकेने टॅरिफसंदर्भात उचललेलं पाऊल चुकीचं आहे. असे केल्याने अमेरिकेचेही नुकसान होऊ शकते. निक्की हेली यांच्यानंतर आता अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही भारतासोबतच्या संबंधांबद्दल वॉशिंग्टनच्या निर्णयावर, त्या वागण्यावर टीका केली आहे.
निक्की हेली यांनी काय दिला इशारा ?
प्रथम आपण हे जाणून घेऊया की निक्की हेली यांनी ट्रम्प यांना काय इशारा दिला ? संयुक्त राष्ट्रातील माजी अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्याचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेसाठी भारत खूप महत्त्वाचा आहे. चीनचा सामना करायचा असेल तर अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पुन्हा निर्माण केले पाहिजेत. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारताची भागीदारी असणे अगदी स्वाभाविक आहे. भारत आणि चीन हे अस्वस्थ शेजारी आहेत, त्यांच्यात आर्थिक हितसंबंधांमध्ये संघर्ष आणि वारंवार सीमा वाद आहेत. उत्तरेकडील शेजाऱ्याच्या वाढत्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी भारताला आर्थिक आणि लष्करी दोन्ही बाजूंनी मदत करणे अमेरिकेच्या हिताचे ठरेल. जर अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार वाद दीर्घकालीन दुरावा निर्माण झाला तर ती एक मोठी आणि टाळता येणारी चूक असेल असा इशारा हेली यांनी दिला.
माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन काय म्हणाले ?
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीदेखी अमेरिकेच्या भारतावरील टॅरिफच्या मुद्यावरून (कर आकारणीवर) टीका केली आणि ट्रम्प यांना ‘असामान्य अध्यक्ष’ म्हटले. अमेरिकेचे धोरण गोंधळलेले असल्याचे वर्णन त्यांनी केलं आणि भारतावरर लादलेल्या 50 टक्के टॅरिफबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जॉन बोल्टन म्हणाले की, सध्या भारत-अमेरिका संबंध खूप वाईट स्थितीत आहेत आणि नवी दिल्ली ही मॉस्को आणि बीजिंगच्या जवळ जाण्याचा धोका आहे असा इशारा त्यांनी दिला. पण यामुळे अमेरिकेचे नुकसान होईल. त्यांनी ट्रम्पच्या टॅरिफ निर्णयाचा विरोध केला आणि व्हाईट हाऊसने व्यापार आणि ऊर्जा निर्बंधांवर विसंगत भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले.
भारताला पाठिंबा देऊन चीनने अमेरिकेची केली कोंडी
भारतावर 50% टॅरिफ लादण्यास चीननेही विरोध केला आहे. भारतातील चीनचे राजदूत झू फेईहोंग म्हणाले की, अमेरिकेने भारतावर 50% पर्यंत कर लादले आहेत. चीनने याचा तीव्र विरोध केला आहे. मौन बाळगल्याने केवळ गुंडगिरीला प्रोत्साहन मिळते असे ते स्पष्टपणे म्हणाले. चीन भारतासोबत खंबीरपणे उभा राहील असे सांगत ते पुढे म्हणाले की, भारत-चीन संबंध आशियासाठी फायदेशीर आहेत. आम्ही आशियाच्या आर्थिक विकासाचे जुळं इंजिन आहोत असेही त्यांनी नमूद केलं. दरम्यान अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफच्या निर्णयाला भारातानेही विरोध दर्शवला असून हे अन्यायकारक आणि अतार्किक असल्याची टीका केली होती.
टॅरिफवरून ट्रम्प घेणार का यू-टर्न ?
फक्त बाहेरील देशांतून नव्हे तर टॅरिफच्या मुद्यावरून घरात आहेर मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता तरी या इशाऱ्यांकडे लक्ष देतील का ? ते टॅरिफवरू यू-टर्न घेतील का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्याने त्यांचेही खूप नुकसान होईल अशी भीती अमेरिकेलाही आहेच. कारण आम्ही अमेरिकेच्या अटी मान्य करणार नाही, हे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे. खरं तर, अमेरिकेला भारताच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रात थेट प्रवेश हवा आहे. आणि भारताला हे नको आहे. म्हणूनच अमेरिका संतापली आहे. काहीही किंमत मोजावी लागली तरी भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही असे पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे आत ट्र्म्प यांची आडमुठी भूमिका कायम राहणार की ते बदलाबद्दल विचार करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.