
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील जवळपास सर्वच देशांवर कर लादला आहे. त्यामुळे भारतासह बरेच देश अमेरिकेवर नाराज आहेत. बऱ्याच देशांनी अमेरिकेसोबतचा व्यापार थांबवला आहे. अशातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने टॅरिफच्या निर्णयात सुधारणा केली आहे. ट्रम्प यांनी काही वस्तूंना शुल्कातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिकन कर निवडक उत्पादनांवरच लागू होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेने 2 एप्रिल रोजी कोणत्या वस्तूंवर किती कर असेल याची घोषणा केली होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने हा कर विविध देशांवर लादण्यात आला होता. मात्र आता अमेरिकेने शुल्कात काही बदल केले आहेत. सोन्याशी संबंधित काही वस्तू आणि औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना शुल्कातून वगळले आहे. शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नवा बदल सोमवारपासून लागू होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक विशेष आदेश जारी केला. यात ग्रेफाइट, टंगस्टन, युरेनियम, सोने बुलियन आणि इतर अनेक धातूंवरील विविध देशांवर लादल्यात आलेले शुल्क हटवण्यात आलं आहे. स्यूडोफेड्रिन, अँटीबायोटिक्स आणि इतर काही औषधांवरील शुल्कही हटवण्यात आले आहे. मात्र सिलिकॉन उत्पादनांवरील शुल्क कायम आहे. मात्र अमेरिकेने रेझिन आणि अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईडवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने गेल्या महिन्यात भारतासह बऱ्याच देशांवर कर लादला होता. हा कर लादण्यापूर्वी ट्रम्प यांनी काही देशांसोबत करार केले होते. मात्र ज्या देशांनी अमेरिकेसोबत करार केला नाही अशा देशांवर कर जास्त कर लादण्यात आला होता. यामुळे आता जे देश अमेरिकेला वस्तूंची निर्यात करतात त्यांना अधिक कर द्यावा लागणार आहे. यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत भर पडली असली तर अनेरिकन नागरिकांना या वस्तू आता महागड्या किमतीत खरेदी कराव्या लागत आहेत.
अमेरिकेने भारतावर सुरुवातीला 25 टक्के कर लादला होता. मात्र रशियन तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे भारताची अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे. तसेच ज्या वस्तू निर्यात करण्यात आल्या आहेत, त्यांची किंमत वाढली आहे.