
मिडिल ईस्ट मधील वातावरण तापत चाललं आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी धमकीच्या पुढे जात इराणची घेराबंदी सुरु केली आहे. समुद्र, आकाश आणि जमीन तिन्ही आघाड्यांवर युद्धाच्या दृष्टीने तैनाती सुरु झाली आहे. अमेरिकन नौदलाच्या एका मोठ्या ताफ्याने इराणच्या दिशेने कूच केलं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. परिस्थिती अजून बिघडावी अशी इच्छा नाही. पण अमेरिका प्रत्येक क्षण इराणवर नजर ठेऊन आहे असं पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलकांविरोधात सुरु असलेल्या कारवाईवर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे असा ट्रम्प यांनी दावा केला. इराणला चहूबाजूंनी घेरण्यासाठी अमेरिका कुठल्या शस्त्रास्त्रांचा वापर करतेय.
अमेरिकन नौदलाचं एअरक्राफ्ट कॅरिअर USS Abraham Lincoln आपल्या पूर्ण स्ट्राइक ग्रुपसह हिंदी महासागरात तैनात आहे. कुठल्या छोट्या देशाच्या संपूर्ण एअरफोर्स इतकी या एका स्ट्राइक ग्रुपची ताकद आहे. यात F-35C स्टेल्थ फायटर जेट,F/A-18 सुपर हॉर्नेट, EA-18G ग्रोलर (इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर), E-2D हॉकआय आमि MH-60 सीहॉक हॅलिकॉप्टर यांचा समावेश आहे.
शेकडो क्रूझ मिसाइल्स
या विमानवाहू युद्धनौकेसोबत Ticonderoga क्लास क्रूज़र आणि Arleigh Burke क्लास डिस्ट्रॉयर आहेत. यामध्ये शेकडो क्रूझ आणि एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम तैनात आहे. इराणवर हल्ला करण्यासह या युद्धनौका अमेरिकी ठिकाणांचं संरक्षण करण्यास सक्षम आहेत.
F-15E Strike Eagle
इराणच्या चारही बाजूला अमेरिकेने F-15E Strike Eagle फायटर विमानं तैनात केली आहेत. त्यात हवेत इंधन भरण्यासाठी KC-135 टँकर विमान आहे. हे जेट्स इस्रायल आणि आखातमधील अमेरिकी ठिकाणांचं संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. C-17 कार्गो विमान सतत शस्त्रास्त्र आणि सैन्य साहित्य पोहोचवत आहे.
हल्ले हवेतच मोडून काढण्यासाठी सक्षम
इराणची प्रत्युत्तराची कारवाई मोडून काढण्यासाठी अमेरिकेने Patriot आणि THAAD एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम तैनात केली आहे. ही सिस्टिम बॅलेस्टिक मिसाइल आणि ड्रोन हल्ले हवेतच मोडून काढण्यासाठी सक्षम आहे.
टायफून फायटर जेट्स तैनात
अमेरिकेसोबत ब्रिटनही आखातामध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. रॉयल एअर फोर्सने टायफून फायटर जेट्स तैनात केले आहेत. ही जेट विमानं डिफेन्स आणि रॅपिड रिस्पॉन्ससाठी ओळखली जातात. क्षेत्रीय स्थिरता आणि मित्र देशांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती केल्याचा ब्रिटनचा दावा आहे. इराणची घेराबंदी होत असताना इस्रायलही पूर्ण सर्तक आहे. त्यांची एअर डिफेन्स आणि एअर फोर्स अलर्ट मोडवर आहे. हल्ला झाल्यास उत्तर अनपेक्षित असेल असं इस्रायली सैन्य अधिकारी बोलतायत.