जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ

बुधवारी व्हेनेझुएलाला दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले, ज्यांची तीव्रता 7.1 आणि 7.5 होती. यामुळे राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. यूएस पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने पोर्तो रिको आणि व्हर्जिन आयलंड्ससाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ
व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचे मोठे धक्के, त्सुनामीचा इशारा
| Updated on: Jun 25, 2026 | 7:52 AM

भूकंपाच्या भयानक धक्क्यांनी व्हेनेझुएला प्रचंड हादरलंय. बुधवारी संध्याकाळी काही मिनिटांच्या अंतराने व्हेनेझुएलामध्ये दोन मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या आणि घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि आणखी धक्के बसण्याच्या भीतीमुळे राजधानीतील नागरिक अजूनही घराबाहेरच आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ दोन शक्तिशाली भूकंप झाले. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’च्या (USGS) माहितीनुसार, पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती, तर अवघ्या काही मिनिटांनंतर झालेला दुसरा भूकंप अधिक तीव्र होता आणि त्याची तीव्रता 7.5 इतकी नोंदवली गेली. या भूकंपांनंतर, ‘यूएस पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने पोर्तो रिको आणि व्हर्जिन आयलंड्ससाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

भूकंपाचा पहिला धक्का हा व्हेनेझुएलाच्या कॅरेबियन किनारपट्टीवरील मोरोन शहरा जवळ — काराकसपासून सुमारे 168 किलोमीटर अंतरावर, 13 किलोमीटर खोलीवर झाल्याची माहिती, USGS ने दिली. तो धक्का थांबतो ना थांबतो तो नोरोनापून 16 किमी दूर आणि 10 किमी खोलीवर दुसरा धक्काही बसल्याचे समजते.

काराकसमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागताच, लोक घाबरले, सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतींमधून बाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यांनी आपल्या डोळ्यांदेखत भिंती कोसळताना आणि घरातील सामान रस्त्यावर विखुरले जाताना पाहून, अनेकजण हादरले होते, नि:शब्द झाले. या भयानक भूकंपानंतर शहरातील अनेक भागातून धुळीचे मोठे ढग वर उठताना दिसले. सहसा रेस्टॉरंट्स आणि दुकानांच्या वर्दळीने गजबजलेल्या या भागत फक्त धुळीच साम्राज्य पसरलेलं,सगळं काही विखुरलेलं दिसत होतं.

व्हेनेझुएलाच्या गृहमंत्र्यांनी काय दिली माहिती ?

या भयानक भूकंपानंतर व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डियोस्डाडो काबेयो यांनी अपडेट्स दिले. काराकसच्या अल्तामीरा भागात परिस्थिती अतिशय चिंताजनक असून तिथे अनेक घरं, इमारती धडाधड कोसळल्या. आफ्टरशॉकमुळे कमकुवत झालेल्या इमारतींच आणखी नुकसान होण्याची भीती असून लोकांनी लगेच घरात जाऊ नये, त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असं गृहमंत्र्यांनी नमूद केलं.

दोन भूकंपानी हादरलेल्या व्हेनेझुएलामध्ये हजारो लोक जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकं चिंतेत आहेत, पण प्रशासन प्रस्थापित कार्यपद्धतींनुसार मदत आणि बचाव कार्य राबवत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्यात यावी असं आवाहन त्यांनी केलं. तसेच कोणत्याही कुटुंबाला मदतीपासून वंचित राहावे लागू नये यासाठी लोकांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, अशी विनंतीही केली.

Follow Us