
इस्रायलविरुद्धच्या युद्धामुळे इराण अडचणीत सापडला आहे. देशातील संसाधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता इराणवर दुष्काळाचेही संकट निर्माण झाले आहे. देशात सर्वत्र पाणी संकट जाणवत आहे. अशातच आता इराणने पाण्याबाबत एक नवीन फर्मान जारी केले आहे. यानुसार आता इराणमधील लोकांना दररोज फक्त 130 लिटर पाणी दिले जाणार आहे. यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
बीबीसी पर्शियनने दिलेल्या माहितीनुसार, इराण सरकारने दुष्काळात निर्माण झालेल्या पाणी संकटाचा सामना करताना नागरिकांना पाणी वाचवण्याची विनंती केली आहे. ऊर्जा मंत्री अब्बास अलीाबादी यांनी, मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
इराणमध्ये पाणी संकट का निर्माण झाले ?
इराणच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील 90 टक्के धरणे कोरडी पडली आहेत. गेल्या 5 वर्षांपासून देशात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. तेहरान, इस्फहान, रझावी खोरासन आणि याझद या प्रांतांमध्ये पाण्याच्या संकट आणखी तीव्र झाले आहे. तसेच राजधानी तेहरानला पाणीपुरवठा करणाऱ्या करज धरणात केवळ 6% पाणिसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
इराणमध्ये केल्या जाणाऱ्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. तसेच इराणची लोकसंख्याही सतत वाढत आहे, त्यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. त्याचबरोबर वेळेवर पाऊस न पडल्याने इराणमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याच कारणामुळे इराणने नागरिकांच्या पाणीवापरावर निर्बंध लावले आहेत.
नागरिकांचा सरकारच्या निर्णयाला विरोध
इराणी सरकारने पाणी वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांनी त्याचा विरोध केला आहे.सरकारने याबाबत म्हटले की, पूर्वी 60 टक्के पाणी तेहरानच्या धरणांमधून पुरवले जात होते. मात्र आता हा आकडा 40 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आला आहे.
तेहरान विद्यापीठातील जलसंपदा विभागाचे प्राध्यापक बनफशेह झहराई यांनी सांगितले की, इराणची राजधानी तेहरानमधील एका व्यक्तीला किमान 190 लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र सरकारने 130 लिटर पाणी वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.