Russia vs US: ‘आम्ही कागदी सिंह नाहीत, एकदा युक्रेनकडे पहा…’ रशियाच्या उत्तराने अमेरिकेची बोलती बंद

अमेरिका सतत रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा उल्लेख कागदी सिंह असा केला होता. यावर आता रशियाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Russia vs US: आम्ही कागदी सिंह नाहीत, एकदा युक्रेनकडे पहा... रशियाच्या उत्तराने अमेरिकेची बोलती बंद
trump-and-putin
| Updated on: Sep 24, 2025 | 10:38 PM

गेल्या काही काळापासून रशिया आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. अमेरिका सतत रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा उल्लेख कागदी सिंह असा केला होता. यावर आता रशियाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहोत आणि आमचे सैन्य युक्रेनमध्ये प्रगती करत आहे. आमची ताकद पहायची असेल तर युक्रेनकडे पहा असा इशाराही रशियाने अमेरिकेला दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रम्प काय म्हणाले होते?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले होते की, ‘पुतिन आणि रशिया मोठ्या आर्थिक संकटात आहेत त्यामुळे युक्रेनने आता आक्रमक कारवाई करण्याची वेळ आली आहे.’ यावर रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निमित्ताने युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती, त्यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याकडून माहिती ऐकली असेल आणि त्यामुळे ते असं विधान करत आहेत.’

रशियन सैन्याची प्रगती सुरु

दिमित्री पेस्कोव्ह हे पुढे बोलताना म्हणाले की, ‘रशियन सैन्य युक्रेनमध्ये प्रगती करत आहे, राष्ट्रपतींनी हे वारंवार सांगितले आहे की आम्ही नुकसान कमी करण्यासाठी खूप सावधगिरीने पुढे जात आहोत. आमची आक्रमक क्षमता कमी होऊ नये म्हणून ही एक अतिशय जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की जे लोक आता वाटाघाटी करण्यास तयार नाहीत त्यांच्यासाठी उद्या आणि परवा परिस्थिती खूप वाईट असेल.’ याचाच अर्थ रशियन सैन्य आगामी काळात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

रशिया कागदी सिंह नाही

दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियाला कागदी सिंह म्हणणाऱ्या ट्रम्प यांना सुनावलं आहे. पेस्कोव्ह म्हणाले की, ‘रशिया हा अस्वल आहे, कागदी सिंह नाही. रशिया आपली लवचिकता कायम ठेवतो. रशिया आर्थिक स्थिरता राखतो. रशियाला अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये काही तणाव आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे, हे सत्य असले तरी यावर उपाययोजना केली जात आहे.’