33 KM लांबीची होर्मुज स्ट्रेट काय आहे ?, इराणने यावर हल्ला केला तर, संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा

जगाला इंधन आणि गॅस पुरवणाऱ्या या मार्गिकेवर जर इराणने हल्ला केला तर जगाचा इंधन पुरवठा ठप्प होईल. मात्र अमेरिका हे होऊ देणार नाही. याचा अर्थ जग मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे.

33 KM लांबीची होर्मुज स्ट्रेट काय आहे ?, इराणने यावर हल्ला केला तर, संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा
iran and israel war news
| Updated on: Jun 14, 2025 | 6:54 AM

संपूर्ण जगाला तेल पुरवठा करण्यात पश्चिम आशियातील आखाती देश पुढे आहेत. इस्रायल आणि इराण युद्धाचा जर भडका उडाला तर होर्मुज स्ट्रेट आणि लाल समुद्र चर्चेत आला आहे. होमुर्ज स्ट्रेटबाबत जगभरात चिंता आहे. येथून जगातील सुमारे २० टक्के इंधन पुरवठा होत असतो. जगाला इंधन पुरवठा करण्यात महत्वाची असलेली ही तेल पुरवठा पाईपलाईन उद्धवस्त करण्याची धमकी इराणने यापूर्वी देखील दिली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी (होर्मुझ स्ट्रेट ) कुठे आहे?

होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजेच होर्मुज स्ट्रेट हे समजून घेण्यासाठी आधी त्याचे भौगोलिक स्थान जाणून घेणे महत्वाचे आहे. होमुर्झची सामुद्रधुनी प्रत्यक्षात पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारी सामुद्रधुनी आहे. त्याच्या उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान आहे. ही सामुद्रधुनी तब्बल १६७ किमी लांब आणि ३३ ते ६० किमी रुंद आहे.

Israel-Iran Conflict Strait of Hormuz

होर्मुझ स्ट्रेट का महत्त्वाची आहे?

होर्मुझ स्ट्रेट ही सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे. हा मार्ग जगातील २० टक्के तेल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. येथून दररोज २१ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल जगाला पुरवले जाते.

होर्मुझ स्ट्रेट नियंत्रित कोणाकडे ?

होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग ३३ किमी रुंद आहे. त्याचा उत्तरेकडील भाग इराण नियंत्रित करतो. या तेल मार्गाचा दक्षिणेकडील भाग ओमान आणि युएई नियंत्रित करतो. या भागात इराणी सैन्य दलाचे नियंत्रण असून मोठ्या संख्येने येथे सैन्यदलाची उपस्थिती आहे. त्यामुळे लष्करी दृष्टिकोनातून इराणचे या क्षेत्रात मोठे वर्चस्व आहे.

इराण ही मार्गिका बंद करेल का?

इराणने आतापर्यंत तरी इअसा कोणताही हेतू जाहीर केलेला नाही. परंतू पूर्वी पाश्चात्य देश आणि अमेरिकेशी जेव्हा तणाव वाढला तेव्हा इराणने अनेक वेळा होर्मुझची सामुद्रधुनी तेल मार्गिका बंद करण्याची धमकी दिलेली आहे. परंतु, त्यांनी कधी असे पाऊल उचलले नाही. मात्र इराणकडे असे करण्याची ताकद मात्र आहे. हा मार्ग काही काळासाठी बंद करण्याची क्षमता इराणकडे आहे.

या मार्गाचा वापर कोण करतो?

तेल पुरवठा आणि आयातीसाठी सौदी अरेबिया, इराण, युएई, कुवेत, कतार आणि इराक होर्मुझची सामुद्रधुनी वापरतात. याच मार्गाद्वारे चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया सारख्या आशियाई देशांना इंधनाचा पुरवठा केला जातो. याशिवाय, जगातील सर्वात मोठा एलएनजी गॅस पुरवणारा कतार गॅस निर्यात करण्यासाठी याच सामुद्रधुनीचा वापर करतो.

जगाच्या इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल?

जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखली तर विशेषतः आशियाई देशांमध्ये कच्च्या तेलाचे गंभीर संकट निर्माण होईल. भारतावरही याचा परिणाम होईल. याशिवाय, अमेरिकेचे मित्र दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यावर मोठे इंधन संकट येऊ शकते.

अमेरिकन नौदलाचा ताफा किती अंतरावर आहे?

अमेरिकन नौदलाचे पाचवे आरमार या भागातील त्याच्या आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांचे संरक्षण करते. तसेच, बहारीनमध्ये देखील अमेरिकन नौदलाचा तळ आहे. बहारीनमधील अमेरिकन ताफा होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून केवळ 600 किमी अंतरावर आहे. त्यामुळे अमेरिका येथे इराणकडून येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर त्वरित कारवाई करू शकतो असे म्हटले जात आहे.