अमेरिकन सैन्याच्या परेडमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना बोलवले? व्हाइट हाउसकडून आले स्पष्टीकरण

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना अमेरिकन स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात बोलवल्याची पोस्ट काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. त्यावर व्हाइट हाऊसकडून स्पष्टीकरण आले आहे.

अमेरिकन सैन्याच्या परेडमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना बोलवले? व्हाइट हाउसकडून आले स्पष्टीकरण
| Updated on: Jun 15, 2025 | 2:48 PM

अमेरिकन लष्कराचा 250 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त वॉशिंग्टन डीसीमध्ये भव्य सैन्य परेडचे आयोजन करण्यात आले होता. त्या परेडमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह अनेक हायप्रोफायल व्यक्ती सहभागी झाल्या. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना बोलवण्यात आल्याचा दावा केला जात होता. हा दावा किती खरा आहे? यासंदर्भात व्हाइट हाऊसकडून स्पष्टीकरण आले आहे.

काँग्रेसकडून सोशल मीडियावर पोस्ट

काँग्रेसचे वरिष्ठ नेता जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी अमेरिकन स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात बोलवल्याचे वृत्त आहे. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहून म्हणून असणार आहे. राजकीय आणि कुटनीतीच्या दृष्टिने भारतासाठी हा मोठा झटका आहे. पहलगाम हल्ल्याच्या वेळी ज्या व्यक्तीने चिथावणीखोर वक्तव्य केले होते, त्याला बोलवल्यामुळे अमेरिकेच्या हेतूवर प्रश्न निर्माण होत आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले होते.

अमेरिकेकडून आला खुलासा

जयराम रमेश यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चा रंगली होती. त्यावर अमेरिकेकडून आता स्पष्टीकरण आले आहे. व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्याने आसिम मुनीर यांना बोलवल्याचे वृत्त फेटाळले आहे. ही बातमी चुकीची आहे. सैन्य परडेसाठी कोणत्याही विदेशी सैन्य अधिकाऱ्यास आमंत्रण दिले नाही, असे स्पष्टीकरण व्हाइट हाऊसने दिले आहे.

भाजप आक्रमक, काँग्रेसवर आरोप

अमेरिकन सरकारकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर भाजप आक्रमक झाला आहे. जयराम रमेश यांनी चुकीची माहिती पसरवली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात असलेल्या वैयक्तीक आकसामुळे खोट्या बातम्या ते पसरवत आहेत.

अमेरिकेत १४ जून रोजी झालेल्या भव्य सैन्य परेडमध्ये ६ हजारापेक्षा जास्त सैनिक, ५० पेक्षा जास्त लढाऊ विमाने सहभागी झाले. या परेडवर ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. त्यामुळे या परेडच्या निर्णयावर अमेरिकेत मोठी टीका होत आहे.