Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या वाईटावर कोण-कोण टपलेलं? आता फायदा कोणाचा? पडद्यामागे वेगळाच खेळ

Sheikh Hasina : सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्यावरुन संपूर्ण बांग्लादेशमध्ये वातावरण पेटलं. याची परिणीत शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा आणि त्यांच्या देश सोडण्यात झाली. वरुन हे सर्व आरक्षणामुळे घडलं असं दिसत असलं, तरी पडद्यामागे वेगळाच खेळ आहे.

Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या वाईटावर कोण-कोण टपलेलं? आता फायदा कोणाचा? पडद्यामागे वेगळाच खेळ
शेख हसिना
Image Credit source: ANI
| Updated on: Aug 06, 2024 | 1:43 PM

बांग्लादेशात सत्ता पालट झाला आहे. शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागलं आहे. शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद याने यामागे परकीय शक्तीचा हात असल्याच म्हटलं आहे. बांग्लादेशात जी स्थिती निर्माण झालीय, त्यामागे अमेरिकेचा गेम प्लान असू शकतो, असं सजीब वाजेद म्हणाला. पाकिस्तानही यामागे असू शकतो, अशी शक्यता वर्तवली. “मी ठोसपणे सांगू शकत नाही, यामागे कोण आहे?. पण पाकिस्तान किंवा अमेरिकेचा हात असू शकतो. पाकिस्तान असं करु शकतो, कारण त्यांना बांग्लादेशात मजबूत, स्थिर सरकार नकोय. त्यांना पूर्वेकडून भारताला त्रास द्यायचा आहे” असं सजीब वाजेद एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

“अमेरिकेला सुद्धा बांग्लादेशात मजबूत सरकार नकोय. त्यांना बांग्लादेश कमकुवत करायचं आहे. त्यांना त्यांच्या नियंत्रणात असलेलं सरकार हवय. अमेरिकेला शेख हसीन यांना आपल्या तालावर नाचवण जमलं नाही” असं सजीब वाजेद म्हणाला. सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन या सर्व आंदोलनाला सुरुवात झाली. पण आज आंदोलनाने विक्राळ रुप घेतलं आहे. ते पाहून अनेक विश्लेषकांच म्हणणं आहे की, यामागे एखादी परकीय शक्ती असू शकते. बांग्लादेशच्या स्थितीमागे अमेरिकेचा हात असू शकतो, असं प्रसिद्ध रणनितीक विश्लेषक ब्रह्म चेलानी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

हे दोन देश नाराज

“शेख हसीना एका धर्मनिरपेक्ष सरकारच नेतृत्व करत होत्या. कट्टरपंथीय त्यांचा द्वेष करायचे. हसीना यांनी बांग्लादेशला वेगाने आर्थिक विकासाकडे नेलं. पण शक्तीशाली परकीय शक्ती त्यांच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या. तीस्ता प्रकल्प भारताला देण्याच्या त्यांच्या निर्णयावर चीन नाराज होता. बायडेन सुद्धा शेख हसीना सरकारच्या विरोधात होते” असं ब्रह्म चेलानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या लेखात म्हटलं आहे.


बांग्लादेशला दूर ठेवलं पण पाकिस्तानला बोलावलं

ब्रह्म चेलानी यांनी Nikkei Asia साठी लेख लिहिला. त्यात त्यांनी म्हटलय की. “बांग्लादेशने प्रभावशाली विकास केला. राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानपेक्षा बांग्लादेशची स्थिती बिलकुल उलट आहे. बायडेन प्रशासनाने, बांग्लादेशला 2021 आणि या वर्षाच्या सुरुवातीला आयोजित केलेल्या लोकशाही शिखर सम्मेलनापासून दूर ठेवलं. त्याचवेळी पाकिस्तानला दोनवेळा निमंत्रित करण्यात आलं”