
गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. युक्रेन-रशिया युद्धाबाबत अमेरिका आणि युरोपियन देश रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे युद्ध थांबण्याऐवजी आणखी भडकत असल्याचे दिसत आहे. अशातच आता रशियाकडून तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीला सुरु झाल्याचे बोलले जात आहे. कारण रशियाने पहिल्यांदाच जपानजवळ एक अणु पाणबुडी तैनात केली आहे. यामुळे जपान, अमेरिका आणि जगातील देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही काळापासून रशिया आणि चीन हे आपली समुद्री ताकद वाढवत आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. युक्रेन संघर्षामुळे जपानने रशियावर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत, त्यामुळे रशियाकडून कारवाईची धमकी देण्यात आली आहे. जपानमधील उत्तरेकडील कुरिल बेटांबाबत रशियाचा जपानशी दीर्घकाळापासून वाद आहे, आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाकडे लोटले जाऊ शकते.
अमेरिकन गुप्तचर संस्थांनी रशियाच्या हालचालींबाबत काही अहवाल सादर केले आहेत. यानुसार, रशियाने मोठ्या युद्धासाठी अणु शस्त्रे लाँच करण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. 5460 अणु शस्त्रांसह रशिया हा अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अणुशक्ती असणारा देश आहे. अमेरिकन सायंटिस्ट्स फेडरेशनने रशियाच्या अणु शस्त्रांबाबत एक अहवाल सादर केला आहे. यात याबाबत माहिती देण्यात आले आलेली आहे.
रशियाकडे असलेल्या 5460 अणु शस्त्रांपैकी अंदाजे 1718 शस्त्रे सध्या तैनात आहेत, अणु हल्ल्यासाठी सज्ज आहेत. रशियाची ही शस्त्रे जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने हल्ले करु शकतात. रशियाने सोव्हिएत काळातील शस्त्रास्त्रांच्या जागी सरमत (RS-28), यार्स आयसीबीएम आणि पाणबुडीवर आधारित बोरी-क्लास ही आधुनिक शस्त्रे तैणात केली आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2025 रोजी जपानच्या किनाऱ्यावर रशियन नौदलाची अणु बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी दिसली होती. पहिल्यांदाच ही पाणबुडी या भागात दिसली आहे. जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही रशियन पाणबुडी क्रूझर आरएफएस वर्याग आणि बचाव टग फोटी क्रिलोव्हसह ला पेरूस सामुद्रधुनीतून प्रवास करत होती. ही सामुद्रधुनी जपानचे मुख्य बेट, होक्काइडो आणि रशियाच्या सखालिन बेटाच्या दरम्यान आहे. जपानच्या केप सोयाच्या ईशान्येस सुमारे 38 किलोमीटरवर सामुद्रधुनीजवळ ही पाणबुडी दिसली. ही पाणबुडी जपानच्या सागरी सीमेच्या बाहेर होती, मात्र तरीही ही जपानसाठी चिंतेची बाब आहे, त्यामुळे जपानने सागरी सीमेवरील दक्षता वाढवली आहे.