
Police Dress : पोलीस दलात काम करणाऱ्यांसाठी त्यांच्या अंगावरची वर्दी फक्त एक साधारण ड्रेस नसतो. हा ड्रेस म्हणजे एक जबाबदारी, कर्तव्य, अभिमानाची भावना असते. पोलिसाची वर्दी अंगावर घातली की पोलीस कर्मचाऱ्यांना अभिमान वाटतो. सोबतच ही वर्दी जोपर्यंत अंगावर असते तोपर्यंत शेवटपर्यंत संबंधित व्यक्ती कर्तव्यास बांधील असते. परंतु निवृत्तीनंतरही हीच खाकी वर्दी पुन्हा परिधान करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे खाकी वर्दी अंगावर चढवण्याचे नेमके नियम काय आहेत? कोणत्या परिस्थितीत निवृत्तीनंतरही ही वर्दी पुन्हा परिधान करता येते? हे जाणून घेऊ या…
खरं म्हणजे निवृत्तीचा प्रसंग हा पोलिसांसाठी फार भवनिक क्षण असतो. खाकी वर्दी घालून आयुष्यभर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. निवृत्तीनंतर मात्र आता ते काम करता येत नाही. पोलिसांची सेवा समाप्त होते. निवृत्तीनंतर पोलीस कर्मचाऱ्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे जगावे लागते. कारण एकदा निवृत्त झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांची खाकी वर्दी परिधान करता येत नाही.
निवृत्तीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांना खाकी वर्दी परिधान करता येत नाही. कारण पोलिसांची खाकी वर्दी हे एक सेवेचे प्रतिक आहे. म्हणजेच जी व्यक्ती ही वर्दी परिधान करते ती पोलीस सेवेत सक्रीय असल्याचे समजले जाते. पोलीस अधिनियम 1861 कायदा तसेच या कायद्यात वेळोवेळी केलेल्या बदलानुसार सेवेत सक्रीय असलेली व्यक्तीच पोलिसांची वर्दी परिधान करू शकते. निवृत्तीनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याने खाकी वर्दी परिधान केली तर ते कायद्याचे उल्लंघन समजले जाते.
निवृत्तीनंतर खाकी वर्दी परिधान करण्यास परवानगी नसली तरीही काही विशेष प्रसंगाला ती परिधान करता येते. एखादा औपचारिक कार्यक्रम असेल, पोलीस स्मृती दिवस असेल, राज्यस्तरीय कार्यक्रम, सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असेल तर संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांची वर्दी परिधान करता येते. मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सेवानिवृत्त पोलीस त्यांना मिळालेली पदकं, चिन्ह, रँक सामान्य कपड्यांवर लावू शकतात. परंतु त्यांना पोलिसांची पूर्ण वर्दी परिधान करण्याची परवानगी नसते.