या योजनेचा लाभ घ्या आणि फक्त 300 रुपयांत सिलेंडर मिळवा!

सरकारने या योजनेअंतर्गत एलपीजी सिलेंडरसाठी सबसिडी वाढवली असून, आता पात्र लाभार्थ्यांना एक सिलेंडर फक्त ३०० रुपयांत मिळतो. ही योजना नक्की कोणती आहे ? आणि कोण या योजनेसाठी पात्र आहेत ? हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

या योजनेचा लाभ घ्या आणि फक्त 300 रुपयांत सिलेंडर मिळवा!
How to Benefit from the Ujjwala Yojana
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 12:19 AM

पूर्वी गावाकडच्या घरांमध्ये मातीच्या चुलीवर जेवण बनायचं. धुरामुळे डोळ्यांना जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा. पण आता काळ बदललाय! आता गावं-खेड्यांपासून शहरांपर्यंत गॅस चूल आणि सिलेंडरचा वापर वाढलाय. यामुळे जेवण बनवणं सोपं आणि जलद झालंय. पण सिलेंडरच्या किंमती वाढत असताना सामान्य माणसाचं बजेट कोलमडतं. अशा वेळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब महिलांसाठी मोठा आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत 14.2 किलोचा सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त मिळतंय! कोणाला हा लाभ मिळू शकतो? अर्ज कसा करायचा? चला, याची सविस्तर माहिती घेऊया.

उज्वला योजना म्हणजे काय?

केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. ही योजना गरीब आणि ग्रामीण कुटुंबांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी आहे. लाकडं, कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्या यांचा वापर कमी करून पर्यावरण आणि महिलांचं आरोग्य सुधारणं हा यामागचा उद्देश आहे. या योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि स्वस्त सिलेंडर मिळतं. आतापर्यंत 10 कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

300 रुपये स्वस्त सिलेंडर कसं मिळतं?

उज्ज्वला योजनेअंतर्गत 14.2 किलोच्या सिलेंडरवर 300 रुपयांची सब्सिडी मिळते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. उदाहरणार्थ, मुंबईत सध्या या सिलेंडरची किंमत 852 रुपये आहे. पण उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हाच सिलेंडर 552 रुपयांना मिळतो. ही सब्सिडी वर्षात 12 सिलेंडर रिफिलसाठी मिळते. यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो.
केंद्र सरकारने ही सब्सिडी 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे.

कोण घेऊ शकतं या योजनेचा लाभ?

1. अर्जदार ही भारतीय नागरिक असलेली महिला असावी.

2. तिचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं.

3. तिचं नाव गरीबी रेखेखालील (BPL) कुटुंबांच्या यादीत असावं.

4. तिच्या घरात आधीपासून कोणत्याही तेल कंपनीचं गॅस कनेक्शन नसावं.

5. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अति मागासवर्ग (OBC), अंत्योदय अन्न योजना (AAY), प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, वनवासी किंवा SECC यादीतील कुटुंबातील महिलांना प्राधान्य मिळतं.
महत्त्वाचं म्हणजे, प्रवासी मजुरांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यांच्यासाठी स्वयं-घोषणापत्र दाखल करून अर्ज करता येतो.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं

आधार कार्ड , बीपीएल रेशन कार्ड , बँक खात्याचा तपशील (पासबुक), निवासाचा पुरावा , पासपोर्ट आकाराचा फोटो, वयाचा पुरावा (आवश्यक असल्यास), जातीचा दाखला (लागू असल्यास)

लक्षात ठेवा : अर्जदाराचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे, जेणेकरून सब्सिडीची रक्कम थेट खात्यात जमा होईल.

अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

1. उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmuy.gov.in वर जा.

2. मुख्य पेजवर “Apply for New Ujjwala 2.0 Connection” या पर्यायावर क्लिक करा.

3. इंडेन, भारत पेट्रोलियम किंवा एचपी गॅस यापैकी एक गॅस एजन्सी निवडा.

4. ऑनलाइन फॉर्म भरा. यामध्ये वैयक्तिक माहिती, कागदपत्रांचा तपशील आणि बँक खात्याची माहिती द्या.

5. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.

6. हा फॉर्म आणि कागदपत्रं जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करा.

7. सत्यापनानंतर 10-15 दिवसांत गॅस कनेक्शन मिळेल.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:

1. जवळच्या गॅस वितरकाकडे जा.

2. तिथून उज्ज्वला योजनेचा अर्जाचा फॉर्म घ्या.

3. फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रं जोडा.

4. हा फॉर्म गॅस एजन्सीमध्ये जमा करा.

5. सत्यापनानंतर तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन, पहिलं रिफिल आणि गॅस चूल मिळेल.