
IFS Officer salary : अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. पण सगळ्यांनाच ती मिळते असे नाही. अनेक नोकऱ्या अशा आहेत ज्यात अनेक सोयी मिळतात. पण ती मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशीच एक नोकरी म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवेची नोकरी. भारतात IAS किंवा IPS होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण त्यासोबत IFS अधिकारी देखील मोठी जबाबदारीचे पद आहे. आयएफएस अधिकारी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असतात. परराष्ट्र सचिव हे आयएफएस अधिकाऱ्यांचे प्रमुख असतात.
आयएफएस अधिकाऱ्यांचे काम हे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थान मजबूत करणे हे आहे. भारताव्यतिरिक्त जगातील विविध देशांमध्ये IFS अधिकारी नियुक्त केले जातात. ते इतर देशांमध्ये भारताचे मुत्सद्दी म्हणून काम करतात. ज्या देशात त्यांना पोस्टिंग दिली जाते त्या देशासोबत भारताचे संबंध चांगले करण्याची जबाबदारी त्यांची असते.
परदेशात नियुक्ती होत असल्याने हे पद खूप महत्त्वाचे असते. या नोकरीत इतरही अनेक फायदे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका IFS अधिकाऱ्याला सुमारे 60,000 रुपये प्रारंभिक पगार दिला जातो. तर परदेशात पोस्टिंग केल्यावर त्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. याशिवाय, एखाद्या IFS अधिकाऱ्याचा पगार संबंधित देशाच्या क्रयशक्तीवरही अवलंबून असतो, जसे महागड्या देशांमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांना जास्त पगार दिला जातो.
पगारासह, IFS अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे, प्रवास भत्ता इत्यादींसह इतर अनेक भत्ते दिले जातात. याशिवाय त्यांना घर, कार, वैयक्तिक कर्मचारी आणि रक्षकही दिले जातात. याशिवाय या अधिकाऱ्यांना वैद्यकीय लाभ, पेन्शन, मोफत फोन कॉलची सुविधाही दिली जाते.
IFS अधिकारी होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जी सर्वात कठीण परीक्षेपैकी एक आहे. यासाठी २१ ते ३२ वयोगटातील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. परीक्षेअंतर्गत प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू असा तीन परीक्षा पास व्हाव्या लागतात. UPSC परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्यांनाच IFS मध्ये जाण्याची संधी मिळते.