
वॉशिंग्टन : 52 वर्षांपूर्वी 20 जुलै 1969 साली मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. 20 जुलै रोजी दुपारच्या 4.17 मिनिटांनी अपोलो 11 हे यान माणसाला घेऊन चंद्रावर उतरले. नील आर्मस्ट्राँग(neil armstrong) हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव आहे. यानंतर अनेक देशांनी चंद्रावर जाण्याच्या मोहिमा आखल्या. यानंतर आता पुन्हा एकदा स्पेस एजन्सी NASA ने चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची मोहिम आखली आहे. नासा ‘आर्टेमिस-1’ रॉकेट लाँच करणार आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर नेण्याचे नासाचे लक्ष्य आहे. यासाठी नासाने विशेष मोहिम देखील आखली आहे. माणसाला पुन्हा एकदा चंद्रावर घेऊन जाण्याची जय्यत तयारी नासाकडून सुरू आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाच्या ‘आर्टेमिस-1’ मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर नेले जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात लवकरच होणार आहे. 29 ऑगस्ट, 2 सप्टेंबर किंवा 5 सप्टेंबरला हे ‘आर्टेमिस-1’ हे मेगा रॉकेट लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
हे रॉकेट मानवरहीत आहे. हे रॉकेट चंद्रावर जाईल व तेथून परत येईल. नासाच्या एक्सप्लोरेशन सिस्टम डेव्हलपमेंट मिशनचे असोसिएट अॅडमिनिस्ट्रेटर जिम फ्री यांनी सांगितले की ‘आर्टेमिस-1’ मेगा रॉकेट हे या मोहिमेतील पहिले पाऊल असेल. 2025 पर्यंत माणसाला पुन्हा एकदा चंद्रावर नेण्याचे लक्ष्य यामधून गाठले जाईल.
या मोहिमेत एक महिलाही असेल जी चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरेल. 29 ऑगस्टला अमेरिकन वेळेनुसार सकाळी 8.33 वाजता लाँच विंडो उघडली जाईल जी दोन तासांसाठी खुली राहील. जर यावेळी रॉकेट लाँच झाले तर ही मोहीम 42 दिवसांसाठी सुरू राहील आणि हे रॉकेट पुन्हा 10 ऑक्टोबरला पृथ्वीवर परत येईल.
2 सप्टेंबरला अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12.48 वाजता दोन तासांसाठी दुसरे लाँच विंडो खुले होईल. जर यावेळी रॉकेट लाँच झाले तर ते 11 ऑक्टोबरला परत येईल. 5 सप्टेंबरला अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी 5.12 वाजता दीड तासासाठी लाँच विंडो खुली होईल. यावेळी रॉकेट लाँच झाले तर ते 17 ऑक्टोबरला परत येईल.
मानवाला सुरक्षितपणे चंद्रावर नेणे व तेथून परत आणणे यासाठीची ही चाचणीच असेल. ही चाचणी यशस्वी झाल्यास प्रत्यक्षात मानवाला चंद्रावर नेले जाणार आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास नासाची यशस्वी कामगिरी ठरणार आहे.