समंथासोबत गर्दीत धक्काबुक्की, लटपटले पाय..; व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने रविवारी हैदराबादमधल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात चाहत्यांनी एवढी गर्दी केली की समंथाला तिथून बाहेर पडताना प्रचंड त्रास झाला. तिला धक्काबुक्की झाली, चालताना तिचे पाय लटपटले.

सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. त्यामुळे हे सेलिब्रिटी जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहतात, तेव्हा चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळते. त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी ते धडपड करत असतात. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये जे चित्र सोशल मीडियावर पहायला मिळतंय, ते त्रासदायक आहे. एका कार्यक्रमातून बाहेर पडताना अभिनेत्री निधी अग्रवालला चाहत्यांनी अक्षरश: घेरलं आणि त्यातून वाट काढत गाडीपर्यंत पोहोचण्यासाठीही तिला खूप कसरत करावी लागली. अशीच काहीशी घटना आता अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत घडली आहे.
रविवारी समंथा हैदराबादमधल्या एका शॉपच्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचली होती. या कार्यक्रमातून बाहेर पडताना तिथे चाहत्यांची बरीच गर्दी जमली होती. चाहत्यांच्या गर्दीतून आपल्या गाडीपर्यंत पोहोचताना समंथाला जो संकोचलेपणा जाणवला, तो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका क्षणाला ती चालताना अडखलीसुद्धा.. परंतु तिच्या बॉडीगार्डने तिला पडण्यापासून वाचवलं. काहींनी तिला धक्कासुद्धा दिला. यादरम्यान समंथा प्रचंड अस्वस्थ झाली होती. अखेर कसंबसं तिला गाडीपर्यंत पोहोचवलं. समंथाला गाडीत बसवण्यासाठी पोलिसांचीही मदत घ्यावी लागली.
पहा व्हिडीओ
Why fans in south don’t understand boundaries even after rajasaab incident byu/Hungry_Business592 inBollyBlindsNGossip
समंथासोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत. तिला घेरणाऱ्या चाहत्यांना अनेकांनी फटकारलं आहे. सेलिब्रिटींसोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करण्यासाठी जे चाहते मर्यादांचंही पालन करत नाहीत, त्यांच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच निधीसोबत अशीच घटना घडल्यामुळे अशा ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.
समंथाने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिरमोरूशी लग्न केलं. कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. या दोघांच्या वयात सात ते आठ वर्षांचं अंतर आहे. राज निदिमोरूचंही हे दुसरं लग्न आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं.
