
आपले आरोग्य ठणठणीत आहे की काही आजाराची लक्षणे आहेत. हे पटकण समजणं कठीण असतं. पण तुम्हाला माहितीये आपली नखे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या नखांवरून आपण याचा अंदाज नक्कीच लावू शकतो कि आपण किती वर्ष जगणार ते. होय, या प्रश्नाचं उत्तर नखांमध्ये दडलंय. हार्वर्डचे डॉ. डेव्हिड सिंक्लेअर यांच्या संशोधनानुसार याची नखांवरून याचा तर्क काढणं शक्य आहे. डॉ. डेव्हिड सिंक्लेअर यांनी एका अभ्यासातून असा दावा केला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या नखांची वाढ आणि आरोग्य हे सांगतं की, तो किती काळ जगणार आहे.
तुमची नखे लवकर वाढत असतील तर……
संशोधनानुसार जर तुमची नखे लवकर वाढत असतील तर ते एक सकारात्मक लक्षण असल्याच डॉक्टरांनी म्हटलं आहे. कारण याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात नवीन पेशी योग्यरित्या तयार होत असून वृद्धत्व कमी वेगाने होत आहे, म्हणजेच तुम्ही जास्त काळ जगणार आहात.
तर, दुसरीकडे तुमच्या नखांची वाढ हळूवार गतीने होत असेल तर तुमचं वय वेगाने वाढत असल्याचं लक्षण मानलं जातं. या संशोधनानुसार याचा अर्थ तुम्ही जास्त काळ जगणार नाहीत. त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं.
नखांच्या वाढीवरून समजे तुमचे आरोग्य कसे आहे ते?
डॉ. सिंक्लेअर यांनी त्यांच्या पॉडकास्ट लाईफस्पॅनमध्ये हा धक्कादायक खुलासा केला असून जो आनुवंशिकता आणि वृद्धत्वावर आधारित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की नखे हे शरीराच्या पेशींच्या नूतनीकरण दराचे सर्वात अचूक लक्षणं मानलं जातं. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा नखे जलद वाढतात कारण त्यात प्रथिने आणि पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होतो, असं वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलं जातं. यावरून असे दिसून येते की तुमचे शरीर आतून मजबूत असून हळूहळू वयाच्या परिणामांना तोंड देत आहेत.
नखे निरोगी तर तुमचे आरोग्य निरोगी….
डॉ. सिंक्लेअर यांच्या मते, नखांची वाढ तुमच्या आहारावर, झोपेवर, व्यायामावर आणि तणावाच्या पातळीवर देखील अवलंबून असल्याचा दावा त्यांनी केला आहे. निरोगी जीवनशैलीमुळे नखे जलद वाढण्यास मदत मिळत असते. त्यामुळे दीर्घयुष्यासाठी प्रथिने, बायोटिन आणि जीवनसत्त्वे असलेला चांगला आहार घेणे आवश्यक आहे. तसंच वेळेवर झोपा, ताण कमी करा आणि नियमित व्यायाम करणे हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींमुळे, तुमचे नखे निरोगी राहतील आणि तुमचे दीर्घायुष्य होण्याची शक्यता वाढण्यास मदत मिळते.