
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफचा बडगा उचलला आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतावर देखील ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लावला. मात्र यावरही त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यात वाढ केली. त्यांनी टॅरिफ आता 50 टक्के लादला आहे. त्यामुळे देशभरात या निर्णयामुळे काय परिणाम होतील याची चर्चा सुरु झाली आहे. भारताने त्यांच्या हुकूमशाही टॅरिफचा विरोध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हा निर्णय अन्यायकारक आणि अविवेकी असल्याचं भारताने सांगितलं आहे. असं सर्व घडत असताना हा टॅरिफ म्हणजे नेमकं आहे तरी काय? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर सोप्या भाषेत त्याबाबत समजून घ्या.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. म्हणजेच अमेरिकन बाजारात उपलब्ध असलेली सर्व भारतीय उत्पादनं आता अधिक महाग होतील. उदाहरणार्थ, भारतात एखाद्या वस्तुची किंमत ही 100 रुपये आहे. तीच वस्तू तुम्हाला अमेरिकेत जाऊन विकायची असेल तर त्यावर 50 टक्के कर भरावा लागेल. म्हणजेच त्या वस्तूच्या माध्यमातून अमेरिकेच्या खात्यात 50 रुपये जातील. म्हणजेच त्या वस्तूची किंमत 150 रुपये होईल. या निर्णयामुळे वस्तूंची किंमत वाढले आणि मागणीत घट होईल. त्यामुळे कर भरूनही उत्पादनं बाजारात टिकून राहणार नाहीत. त्या तुलनेत अमेरिकने उत्पादनं ही स्वस्त असतील.
टॅरिफ लादण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत कंपन्या त्या किंमतीत उत्पादन तयार करू शकत नाही. त्यामुळे टॅरिफ लादून विदेशी माल महाग केला जातो. त्यामुळे लोकांचा कल स्वदेशी माल खरेदीकडे जातो. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळते. उद्योग धंदे बंद होत नाही. नोकऱ्यांचं प्रमाण वाढतं. सरकार उद्योगासोबत रोजगारही सुरक्षित करतात.
दुसरं कारण म्हणजे देशातील व्यवसायिक तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफ लावलं जातं. काही देश निर्यातीच्या तुलनेत आयात मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्याचा समतोल राखण्यासाठी टॅरिफ लावलं जातं. तिसरं म्हणजे, यामागे राजकीय गणितं असतात. शत्रूराष्ट्रांना आर्थिक अडचणीत आणण्यासाठी टॅरिफ लावला जातो. चौथं म्हणजे देशाची तिजोरी भरण्यासाठी टॅरिफ लावला जातो. या माध्यमातून मोठा निधी उभारला जातो आणि देशाचा गाडा हाकण्यास या पैशांची मदत होते. पाचवं म्हणजे टॅरिफमुळे दर्जेदार उत्पादनं बाजारात टिकतात. तसेच खराब उत्पादनं बाजारात येत नाहीत. म्हणजेच टॅरिफ एका फिल्टरसारखं कामं करतं.