
आपण रोजच्या आयुष्यात अनेक वेळा “Ladies First” हा शब्द ऐकतो. म्हणजेच कुठल्याही ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी किंवा औपचारिक प्रसंगी महिलांना प्राधान्य दिलं जातं. लिफ्टमध्ये असो, दरवाजा उघडण्याची वेळ असो किंवा एखाद्या कार्यक्रमात प्रवेशाची वेळ बऱ्याचदा पुरुष स्वतः बाजूला होऊन महिला आधी जाण्याचा आग्रह करतात. ही एक सभ्यतेची खूण मानली जाते. पण कधी विचार केलात का, या परंपरेची सुरुवात नक्की कुठून झाली? हे काही फक्त आजचं आधुनिक संस्कारांचं उदाहरण नाही, तर यामागे आहे एक ऐतिहासिक आणि रोचक कहाणी.
“लेडीज फर्स्ट” म्हणण्याची ही परंपरा युरोपातील शाही आणि संपन्न घराण्यांतून सुरू झाली होती. त्या काळात महिलांना विशेष सन्मान दिला जात असे. त्यांना नाजूक, आदरणीय आणि कुटुंबाचा गौरव मानलं जात होतं. म्हणूनच त्या काळात मुलांना लहानपणापासून शिकवलं जात असे की, महिलांसाठी दरवाजा उघडा, त्यांना आधी बसायला सांगा आणि कुठल्याही ठिकाणी त्यांना प्राथमिकता द्या. ही केवळ सवय नव्हे, तर त्या समाजाचा एक संस्कारी भाग होता. याचा अर्थ असा नव्हता की महिला कमकुवत आहेत, तर त्यांना आदराने आणि प्रेमाने वागवलं पाहिजे, हा संदेश होता.
जरी आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून चालत आहेत, तरीही ‘लेडीज फर्स्ट’ ही संकल्पना काही ठिकाणी अजूनही मानली जाते. मात्र आता त्यातला हेतू किंचित बदललेला आहे. आजच्या काळात हे महिलांना समान अधिकार आणि आदर देण्याचं प्रतीक मानलं जातं. लिंगभेद न करता, एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा हा एक सुसंस्कृत मार्ग मानला जातो.
1912 मध्ये जेव्हा टायटॅनिक हे भव्य जहाज बुडालं, तेव्हा सर्वप्रथम “Ladies and Children First” हा आदेश दिला गेला होता. त्या प्रसंगी महिलांना आणि लहान मुलांना वाचवण्यासाठी पुढे नेलं गेलं. ही घटना ‘लेडीज फर्स्ट’ च्या विचारसरणीला आणखी बळ देणारी ठरली. त्या घटनेनंतर ही संकल्पना जगभर अधिक स्वीकारली गेली.
काही जुन्या गोष्टींनुसार असंही सांगितलं जातं की, जर्मनीच्या काही भागांत, जेव्हा माणसं अजून गुहांमध्ये राहत होती, तेव्हा पुरुष एखादा धोका असल्यास महिलांना आधी पुढे करत असत आणि मग स्वतः मागून आक्रमण करत. जरी ही गोष्ट थोडी विनोदी वाटत असली, तरी काही प्रमाणात ती देखील ‘Ladies First’ या म्हणीचा एक सुरुवातीचा संदर्भ मानला जातो.
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यानं एकदा आपल्या शोमध्ये म्हटलं होतं की, “जेव्हा मुलगी होते तेव्हा तिला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात महिलांनी केली तर यश हमखास मिळतं.” त्यानं चंद्रयान मोहिमेचा उल्लेख करत म्हटलं की, त्या टीममध्ये अनेक महिला वैज्ञानिक होत्या आणि त्यांनी भारताचं नाव उंचावलं. हे देखील ‘लेडीज फर्स्ट’ या परंपरेला आजच्या संदर्भात लागू होतं.
आजच्या आधुनिक समाजात ‘लेडीज फर्स्ट’ ही फक्त एक शिष्टाचाराची खूण नाही, तर ती आहे स्त्रीला दिलेला मान, तिच्या योगदानाची कबुली. कुठलीही संस्कृती तेव्हाच महान ठरते जेव्हा ती आपल्या महिलांना आदर देते, त्यांचं मत आणि हक्क मानते. म्हणूनच ‘Ladies First’ ही जुनी परंपरा असूनही आजही तिचं महत्त्व कायम आहे.