गडचिरोलीत चार तरुणींसह सहा नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

या सहाही जणांवर 32 लाख 50 हजार रुपयांचं बक्षीस सरकारने ठेवलं होतं. पोलिसांनी (Gadchiroli police) भूसुरुंग स्फोटानंतर मोहिम तीव्र करत कारवाईचा वेग वाढवला होता. त्याचंच हे यश मानलं जातंय.

गडचिरोलीत चार तरुणींसह सहा नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
| Edited By: | Updated on: Jul 27, 2019 | 9:24 PM

गडचिरोली : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सहा नक्षलवाद्यांनी (naxals surrendered) गडचिरोली पोलिसांपुढे (Gadchiroli police) आत्मसमर्पण केलं. त्यात चार युवतींसह डीव्हीसी पदावर असलेल्या एका पुरुषाचाही समावेश आहे. या सहाही जणांवर 32 लाख 50 हजार रुपयांचं बक्षीस सरकारने ठेवलं होतं. पोलिसांनी (Gadchiroli police) भूसुरुंग स्फोटानंतर मोहिम तीव्र करत कारवाईचा वेग वाढवला होता. त्याचंच हे यश मानलं जातंय.

1 मे रोजी जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंगस्फोटानंतर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केलं होतं. यामुळे नक्षल्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. शिवाय पोलिस विभाग राबवत असलेली नवजीवन योजना, जनजागरण मेळावे या माध्यमातून नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा मिळाली, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वरिष्ठ नक्षल नेत्यांना उपचार आणि अन्य बाबींसाठी चांगली वर्तणूक दिली जाते. परंतु जंगलातील गरीब नक्षल्यांशी दुजाभाव केला जातो. त्यामुळेही आता नक्षलवादी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. 2019 मध्ये आतापर्यंत 14 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून, त्यात तीन डीव्हीसींचा समावेश आहे.

गोकुळ मडावी हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 4 च्या विभागीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर चकमकीचे 15, खुनाचे 3 आणि भूसुरुंगस्फोटाचे 6 गुन्हे दाखल आहेत. सरकारने त्याच्यावर 8 लाख 50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. 27 एप्रिल रोजी दराची येथे झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला होता. या चकमकीत गोकुळचा सहभाग होता.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं नाव

गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी

रतन उर्फ मुन्ना

शैला उर्फ राजे मंगळू हेडो

जरिना उर्फ शांती दानू होयामी

मीना धूर्वा

भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो