माकन यांचा राजीनामा, दिल्लीत आप-काँग्रेस युती निश्चित?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दिल्लीत सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात दिल्लीत युती होण्याची शक्यता बळावली आहे. किंबहुना, अजय माकन यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आप […]

माकन यांचा राजीनामा, दिल्लीत आप-काँग्रेस युती निश्चित?
Follow us on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दिल्लीत सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात दिल्लीत युती होण्याची शक्यता बळावली आहे. किंबहुना, अजय माकन यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आप आणि काँग्रेस युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दिल्लीत गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून आणली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाविरोधात काँग्रेसकडून अजय माकन हे शड्डू ठोकून होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांचा ‘कॉमन मॅन’चा करिष्मा चालला आणि दिल्लीत आम आदमी पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलं. एकहाती सत्ता मिळवत आम आदमी पक्षाने दिल्ली राज्याची सत्ता काबिज केली. मात्र, देशात आता भाजपचे प्रस्थ वाढत असल्याचे लक्षात आल्याने आगामी निवडणुकीत कोणताच धोका न पत्कारण्यासाठी केजरीवाल काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शक्यतेला माकन यांच्या राजीनाम्याने अप्रत्यक्षपणे दुजोराच मिळाला आहे.

काँग्रेस आणि आप हे दोन पक्ष एकत्र येण्यास दिल्लीत सर्वात मोठा अडथळा कुठला असेल, तर तो अजय माकन यांचा होता. कारण अजय माकन हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे कडवे विरोधक मानले जातात. त्यामुळे अजय माकन हे काँग्रेसचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष असताना आप आणि काँग्रेस यांच्यात युतीची चर्चा कधीच पुढे सरकली नसती, हे स्पष्ट आहे. मात्र, आता या दोन्ही पक्षातील युतीची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता जास्त आहे.

दिल्लीत जर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली, तर या युतीचा परिणाम इतर राज्यांवरही होईल. कारण तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिथेही काँग्रेस नमते घेत युतीसाठी पुढे हात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिल्लीतील आप आणि काँग्रेसची युती झाल्यास देशातील राजकीय वर्तुळात मोठी घटना असेल.

दरम्यान, पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मात्र काँग्रेससोबत युती करण्यास स्पष्ट नाराजी कळवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंजाबमध्ये आपची थेट लढाई काँग्रेससोबत आहे. त्यामुळे त्या राज्यात या युतीचा फटका आपला बसू शकतो. आता अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.