बलात्काऱ्यांना माफ करा, इंदिरा जयसिंग यांच्या आवाहनानंतर निर्भयाची आई भडकली

"सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केले होते. तसेच निर्भयाच्या आईनेदेखील आरोपींना माफ करावे", अशी विनंती ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह (Advocate Indira Jaising) यांनी निर्भयाच्या आईकडे केली.

बलात्काऱ्यांना माफ करा, इंदिरा जयसिंग यांच्या आवाहनानंतर निर्भयाची आई भडकली
| Updated on: Jan 18, 2020 | 12:46 PM

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना लवकरच फाशीची शिक्षा होणार आहे. मात्र, या आरोपींना फाशीची शिक्षा न देता माफ करावं, अशी विनंती ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह (Advocate Indira Jaising) यांनी निर्भयाच्या आईकडे केली आहे. त्यांच्या या विनंतीवर निर्भयाची आई भडकली आहे.

“मी निर्भयाच्या आईच्या दु:खाला समजू शकते. मात्र, आरोपींच्या मृत्यूदंडाला माझा विरोध आहे. मी निर्भयाच्या आईला विनंती करते की, त्यांनी सोनिया गांधी यांच्यासारखं आरोपींना फाशीची शिक्षा देऊ नये. सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केले होते. त्याप्रमाणे निर्भयाच्या आईनेदेखील आरोपींना माफ करावे”, अशी विनंती इंदिरा जयसिंह (Advocate Indira Jaising) यांनी निर्भयाच्या आईकडे केली. त्यांच्या या विनंतीला निर्भयाच्या आईने सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

“महिला वकील इंदिरा जयसिंह यांना अशाप्रकारचा सल्ला देण्याची हिंमत कशी झाली? मी त्यांना सुप्रीम कोर्टात अनेकदा भेटली. त्यावेळी त्यांनी एकदाही माझी विचारपूस केली नाही. आज त्या आरोपींच्या बाजूने बोलत आहेत. अशा प्रकारचे लोक बलात्कार करणाऱ्या नराधमांना पाठिंबा देऊन आपले पोट भरण्याचे काम करतात”, असा आरोप निर्भयाच्या आईने केला.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना 1 फेब्रुवारीला फाशी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याबाबत डेथ वॉरंट जारी केले आहे. या आरोपींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. ती याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने 1 फेब्रुवारीचा तारीख निश्चित करत नवे डथ वॉरंट जारी केले.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपीला गांधी परिवाराकडून माफी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफ केले होते. कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, सोनिया यांनी आरोपीला माफ केल्याचे म्हटले होते. त्यामुळे फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत झाले. गेल्या26 वर्षांपासून आरोपी जेलमध्ये कैद आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा 2008 साली आरोपीला भेटायला जेलमध्ये गेल्या होत्या.