या व्यक्तीमुळे अमृताने सैफला दिलेल्या झोपेच्या गोळ्या; कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचं नातं विविध कारणांमुळे अनेकदा चर्चेत आलं होतं. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अमृताने एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून सैफला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतल्या जोड्यांपैकी एक आहे. 13 वर्षांच्या संसारानंतर हे दोघं 2004 मध्ये विभक्त झाले. 80 आणि 90 च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अमृताची गणना व्हायची. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु आपल्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान सैफशी लग्न केल्यामुळे ती सर्वाधिक चर्चेत होती. मुलांच्या जन्मानंतर मात्र त्यांच्यांत खटके उडू लागले होते. अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी त्यांच्या घटस्फोटापूर्वी सांगितला होता. त्यावेळी सैफ ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होता.
‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्याच करत होते. त्यांनी सांगितलं की ‘सुनो जी दुल्हन’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सैफ सतत रीटेक घेत होता. सैफ अत्यंत सहज अभिनय करणारा असल्याने त्याला इतके रीटेक का घ्यावे लागत आहेत, असा प्रश्न सूरज यांना पडला होता. यामागचं कारण सैफचा तणाव होता. भूमिकेच्या तणावामुळे सैफ रात्रभर झोपू शकत नव्हता. सीन आणखी चांगला कसा करता येईल, याबद्दल तो सतत विचार करत होता. जेव्हा सूरज बडजात्या यांना याविषयी समजलं तेव्हा त्यांनी अमृताशी संपर्क साधला. सैफ रात्रभर झोपू शकत नसल्याचं समजल्यावर त्यांनी तिला सैफला रात्री झोपेच्या गोळ्या देण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नव्हे तर ही गोष्ट सैफला समजू नये, असंही त्यांनी बजावलं होतं.
View this post on Instagram
सूरज बडजाच्या यांनी सांगितल्याप्रमाणे अमृताने एकेदिवशी सैफला त्याच्या नकळत झोपेच्या गोळ्या दिल्या. विशेष म्हणजे ही युक्ती कामीसुद्धा आली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सैफ सेटवर पोहोचला, तेव्हा एका टेकमध्ये त्याने शूट पूर्ण केलं होतं. सैफची कामगिरी पाहून सर्वजण थक्क झाले होते. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात सलमान खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, मोहनिश बहल, तब्बू, रीमा लागू, आलोक नाथ यांच्या भूमिका होत्या.
सैफने अमृताला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. या दोघांना तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत. सैफ आणि अमृताचं नातं जरी कटुतेमुळे संपलं असलं तरी त्यांची मुलं सारा आणि इब्राहिम यांचं करीनाशी चांगलं नातं असल्याचं पहायला मिळतं.
