‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’, दादा भुसेंचा अनोखा उपक्रम, गावात कृषी अधिकारी येतात का? शेतकऱ्यांना विचारणा

| Updated on: Feb 14, 2020 | 12:50 PM

कृषी मंत्री दादा भुसे यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ याची अंमलबजावणी दादा भुसे यांनी केली आहे.

‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’, दादा भुसेंचा अनोखा उपक्रम, गावात कृषी अधिकारी येतात का? शेतकऱ्यांना विचारणा
Follow us on

नाशिक : कृषी मंत्री दादा भुसे यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. (Agriculture Minister Dada Bhuse One day on farm) शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ याची अंमलबजावणी दादा भुसे यांनी केली आहे. दादा भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर इथल्या कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच सुरु केली आहे. दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (Agriculture Minister Dada Bhuse One day on farm)

गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली. शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री भुसे यांनी सुरु केला आहे. कृषी सचिव, आयुक्त यांनी 15 दिवसातून एकदा, तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत.

या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही कृषीमंत्री भुसे यांनी विभागाला सूचना दिल्या आहेत.

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषीमंत्र्यांनी कालपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली. दादा भुसे यांनी काल दिवसभरात अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.