
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून येत्या रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अजित पवारांनी राज्यभरातील महिलांना महत्त्वाची माहिती दिली. “आम्ही अनेक योजना या जनतेसाठी आणल्या आहेत आणि या योजना आणताना मी अभ्यास केला आहे. शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही काम करत आहोत. नाशिकमध्ये आमचं आज उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. आता इथे मला काही बहिणींनी राखी बांधली. रक्षाबंधन साजरा केला. या रक्षाबंधनाच्या निमित्त आम्ही या राज्यातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजना आणली आहे. गरीब महिलांकरिता ही योजना आम्ही आणली आहे. ही योजना राबवायला मी कुठही कमी पडणार नाही हा शब्द तुम्हालक देत आहे. येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्टचे पैसे खात्यात जमा होणार आहेत”, अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिली.
“तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि पाठबळ द्या. पुढील पाच वर्ष ही योजना आम्ही पुढे योग्य पद्धतीने चालू ठेऊ. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. बिरसा मुंडा यांचा हा महाराष्ट्र आहे. तीन सिलेंडरचे पैसे आम्ही अन्नपूर्णा योजनेच्या निमित्ताने आम्ही तुमच्या खात्यात जमा करणार आहोत”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“गरीब घरातील मुलींसाठी आम्ही आता मोफत शिक्षणाची योजना आणली आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठिशी आहे. आम्ही फक्त महिलांसाठी करत आहोत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आम्ही भावांसाठी सुद्धा काम करत आहोत. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याची योजना आणली आहे. मागच वीजबिल सुद्धा माफ केली आहे आणि पुढची वीज आता मोफत होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणी येऊन मागच्या वीज बिलाची वसुली करण्यास आला तर त्यांना माझं नाव सांगा”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
“कांदा निर्यात बंदी व्हायला नको आणि कांद्याची निर्यात ही चालू राहिली पाहिजे ही मागणी आम्ही केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे केली आहे. कांद्याने आमचा वांदा केला आहे. दुधाला सुद्धा आम्ही अनुदान दिलं आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न सोडवण्याचं काम करत आहोत”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“नाशिकला पिण्याचं पाणी देणार आहोत. त्यासाठी नवी किकवी धरणाची योजना आम्ही आखली आहे आणि आम्ही हे सर्व करणार आहोत. जसं बिहार आणि आंध्रप्रदेशला केंद्रातून जास्तीचा निधी मिळाला आहे तसा आपल्याला देखील निधी मिळाला आहे. वाढवण बंदर आत्ता अस्तित्वात येणार आहे आणि त्याला ७६ हजार कोटींचा निधी केंद्रातून मंजूर करण्यात आला आहे आणि हे सगळं सांगण्यासाठी आम्ही जनसन्मान यात्रा काढत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.
“विरोधकांनी आम्हाला काही बोलू द्या. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही विकासाचं काम करू. त्यांनी राजकरण करावं. आम्ही आमच्या कामात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकरण करतो. एक संधी आम्हाला देऊन बघा ना. ही विधानसभेची निवडणूक महिलांची आहे. त्यामुळे आम्ही गावागावत जाऊन आम्ही माय माऊलींचे आशीर्वाद मागणार आहोत.
आम्हाला आशीर्वाद द्या”, असा प्लॅन अजित पवारांनी सांगितला.