‘त्यांना बळीचा बकरा बनवलं’, उच्च न्यायालयाकडून तब्लिगी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

| Updated on: Aug 22, 2020 | 11:17 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तब्लिगी जमातवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत (Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat).

त्यांना बळीचा बकरा बनवलं, उच्च न्यायालयाकडून तब्लिगी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
Follow us on

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देशभरात गाजलेल्या तब्लिगी प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे (Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat). न्यायालयाने या प्रकरणातील 29 परदेशी तब्लिगी जमातींवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने त्यांना बळीचा बकरी बनवण्यात आल्याचंही निरिक्षण नोंदवलं आहे. तसेच त्यांना या प्रकरणात चुकीची वागणूक देणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलं.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने तब्लिगी प्रकरणातील परदेशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 29 तब्लिगी जमातच्या अनुयायांवर वेगवेगळ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. साथरोग कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यान्वये या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवळीकर यांच्या खंडपीठाने आज (22 ऑगस्ट) तीन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. यानुसार आता हे सर्व गुन्हे रद्द करण्यात येणार आहेत.

न्यायालयाने म्हटलं, “भारतात केवळ परदेशी नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग होत आहे, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात त्यांना केवळ ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आलं. त्यांना मदत करण्याऐवजी आपण त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांना विषाणूचा संसर्ग होण्यासाठी जबाबदार धरलं.”

ज्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ते सर्व दिल्लीतील निजामुद्दीनच्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. गुन्हे दाखल झाल्यानंतर या सर्वांनी न्यायालयात दाद मागितली. यावेळी त्यांनी आपली विमानतळावर नियमाप्रमाणे सर्व तपासणी झाली होती. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्यानेच प्रवेश दिल्याचं न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजून ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला.

हेही वाचा :

तब्लिग कनेक्शन : अहमदनगरमध्ये 29 परदेशी नागरिक सापडले, धार्मिक स्थळांवर गुन्हा

उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे

भाज्यांना थुंकी लावणारे, नर्ससमोर नग्न फिरणाऱ्यांना फोडून काढा आणि व्हिडीओ व्हायरल करा : राज ठाकरे

Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat