मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, 35 दिवस मृत्यूशी लढा देत कोव्हिडची लढाई जिंकली

| Updated on: Aug 19, 2020 | 8:49 AM

पुण्यात मुदतीआधी जन्माला येतानाच कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका बाळाने तब्बल 35 दिवस मृत्यूशी लढा दिला आहे (Corona infected Baby recovered in Pune).

मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, 35 दिवस मृत्यूशी लढा देत कोव्हिडची लढाई जिंकली
Follow us on

पुणे : जगभरात वयाच्या प्रत्येक टप्प्यातील लोक कोरोनाचा सामना करत आहेत. मात्र, पुण्यात मुदतीआधी जन्माला येतानाच कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका बाळाने तब्बल 35 दिवस मृत्यूशी लढा दिला आहे (Corona infected Baby recovered in Pune). 1.8 किलो वजन असलेल्या या बाळावर भारती रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी 22 दिवस बाळ व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर या बाळाने कोव्हिडसोबतची लढाई जिंकली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने 35 दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केल्याचा चमत्कार पुण्यातील भारती रुग्णालयात घडला. गर्भवती महिला या उच्च जोखीम गटात येत असल्याने या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातच आई कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याने त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते. हा आजार आईकडून बाळास जाईल की नाही याबाबत असलेले कमी माहिती यामुळे ही भीती वाढली.”

‘बाळाला जन्मतःच श्वास घेण्यास त्रास’

“कोरोना व्हायरस-2 हा आईकडून बाळास होण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे. परंतु असे अतिशय कमी रुग्ण आहेत. सुदैवाने जगभर बहुतांश वेळा कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणाशिवाय जन्मलेले आहे. पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत अपवाद असतात. अशीच घटना पुण्यात एका खासगी रुग्णालयात घडली. एका आईने मुदतीच्या आधी बाळाला जन्म दिला. त्याचे जन्माच्या वेळी वजन फक्त 1.8 किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजन देण्याची गरज होती आणि हे बाळ तपासणीअंती कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आले,” अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.


या बाळाला भारती हॉस्पिटल नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी अशा बाळांसाठी लागणाऱ्या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आहे. येथूनच बाळाची जीवन मृत्यूची लढाई सुरु झाली. अशा जन्मजात बाळांसाठी आपल्या साधारण रुग्णवाहिकेपेक्षा वेगळ्या स्पेशल रुग्णवाहिकेची गरज लागते. अशी रुग्णवाहिका भारती हॉस्पिटल येथे उपलब्ध असल्याने त्यातून बाळास भारती हॉस्पिटल येथे आणण्यात आले.

‘बाळाला वाचवण्यासाठी भारती रुग्णालयाकडून प्रयत्नांची शर्त’

पुढील 2 दिवसात बाळाची श्वासोच्छवासाची अडचण हळूहळू वाढत गेली. बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाच्या विशेष औषधाचे दोन डोसही देण्यात आले. हे सर्व होऊनही, बाळाला 100 टक्के ऑक्सिजन आवश्यक होते. त्याला हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर या विशेष प्रकारच्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक विशेष वायू देखील वापरला गेला. एक विशेष थेरपी (इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन) देखील दिली गेली, जे रोगप्रतिकारक शक्तीस मदत करते.

आईलाही कोरोनाचा संसर्ग

एक्स रेमध्ये दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. प्रौढांमध्ये कोव्हिड-2 ची जी गंभीर लक्षणे दिसून येतात त्यासारखेच हे होते. बाळाच्या रक्ताच्या सर्व तपासण्या ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असल्याचे सूचित करत होत्या. बाळ आणि आई दोघांमध्येही कोविड-2 अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आली. म्हणजेच आईलाही कोव्हिड होऊन गेला होता. पंरतु आईला कोविड-2 ची कोणतीही लक्षणे नव्हती. हा कोरोना विषाणू-2 असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

रोगाच्या तीव्रतेमुळे आणि पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला 5 दिवस उच्च स्टिरॉइड्स डोस (मेथिलप्रेडनिसोलोन) दिले गेले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. बाळ 22 दिवस व्हेंटिलेटरवर राहिले. त्यापैकी हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर 16 दिवसांच्या कालावधीसाठी होते. ही एक अपवादात्मक घटना आहे. अखेरीस 25 व्या दिवशी बाळास व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले. या टप्प्यावर, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात काही फायब्रोसिस दिसून आले. अशा प्रकारचे फायब्रोसिस गंभीर कोविड-2 मधून बऱ्या झालेल्या काही प्रौढ रुग्णांमध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर, 35 व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले.

मुदतपूर्व जन्मलेल्या छोट्या बाळांला कोरोनाची लागण झाल्याचं जगातील पहिलं उदाहरण

मुदतपूर्व जन्मलेल्या लहान बाळाची ही एक अनोखी घटना आहे. त्याला गंभीर कोव्हिड-2 आजाराने ग्रासले होते. जवळजवळ 3 आठवड्यांच्या व्हेंटिलेटर सपोर्ट आणि स्टिरॉइड्सच्या उच्च डोसने (काही प्रमाणात नुकसान झाले तरी) बाळ वाचू शकले. अशा प्रकारच्या गंभीर आजाराची मुदतपूर्व जन्मलेल्या छोट्या बाळांमध्ये जगात कोठेही नोंद झालेली नाही. लहान मुलांमध्ये प्रौढांपेक्षा कोणत्याही आजारापासून बरे होण्याची प्रचंड क्षमता आहे हे चांगले आहे. आम्हाला आशा आहे की काही काळात बाळ या भयानक आजारामुळे झालेल्या नुकसानीवर मात करेल. भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि टीमला मनःपूर्वक धन्यवाद, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

हेही वाचा :

Pune Sero Survey | पुण्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पाच प्रभागात सिरो सर्व्हे, 51.5 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

Pune Corona | कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार द्या, संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Corona infected Baby recovered in Pune