बीडच्या तरुणाची सुसाईड नोट खोटी, मराठा आरक्षण आत्महत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट

| Updated on: Oct 03, 2020 | 11:54 PM

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मी आत्महत्या करतोय, अशी सूसाईड नोट लिहून बीडच्या विवेकने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. मात्र त्या सुसाईड नोटमध्ये विवेकचं हस्ताक्षर नसल्याचं आता समोर आलं आहे.

बीडच्या तरुणाची सुसाईड नोट खोटी, मराठा आरक्षण आत्महत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट
Follow us on

बीड : मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीने बीडच्या विवेक राहाडे या तरूणाने आत्महत्या केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली होती. यामध्ये मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे मी आत्महत्या करतोय, असं म्हटलं होतं. मात्र त्या मजकुरातील हस्ताक्षर विवेकचे नसल्याचा अहवाल औरंगाबादेतल्या हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिलाय. (Beed Vivek Rahade suicide note Fake) त्यामुळे चिठ्ठीचा बनावटपणा उघड झालाय.

औरंगाबादेतल्या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालाने दिल्याने चिठ्ठीमधला फोलपणा समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“या घटनेला वेगळं स्वरुप देण्याच्या हेतूने अज्ञात व्यक्तीने तो मजकूर लिहिला. सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीने तो मजकूर असलेली सुसाइड नोट समाज माध्यमांवर व्हायरल केली. या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची”, माहिती बीडचे पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.

विवेक राहाडे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. घटनास्थळावर एक सुसाईड नोट मिळाली होती. यात त्याने मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळणार नाही याच चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. परंतू सुसाइड नोटमध्ये विवेकचे हस्ताक्षर नसल्याचं आता समोर आलं आहे.

“मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी नुकतीच नीट (NEET) ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीटमध्ये नंबर लागला नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवण्याची माझ्या घरच्यांची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची किव येईल आणि माझे मरण सार्थक होईल”, अशी सुसाईड नोट घटनास्थळी मिळाली होती.

विवेकच्या आत्महत्येनंतर बीड जिल्ह्यात तसंच महाराष्ट्रात खळबळ पसरली होती. राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी विवेकच्या कुटुंबीयांची भेटी घेतल्या होती. तसंच मराठा नेत्यांनी देखील विवेकच्या कुटुंबीयांच्या भेटी घेत सांत्वन केलं होतं.

खासदार छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी विवेकच्या आत्महत्येनंतर फेसबुक पोस्ट लिहून तरूणांनी आत्महत्येचं पाऊल उचलू नये तसंच मराठा तरूणांनी धीर सोडू नये, असं आवाहन उदयनराजेंनी केलं होतं.

(Beed Vivek Rahade suicide note Fake)

संबंधित बातम्या

मी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट

विवेकच्या मृत्यूने रहाडे कुटुंबाची मोठी हानी; तरुणांनो, धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका; उदयनराजेंचं आवाहन