‘नायर’हून रुग्णवाहिकेने ठाणे, ट्रकने राजनोली नाका गाठला, ‘कोरोना’ग्रस्ताचा मुंबई-भिवंडी धोकादायक प्रवास

| Updated on: Apr 26, 2020 | 4:47 PM

भिवंडीतील कोविड-19 रुग्णालयाबाहेर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नायरहून रुग्णवाहिकेने ठाणे, ट्रकने राजनोली नाका गाठला, कोरोनाग्रस्ताचा मुंबई-भिवंडी धोकादायक प्रवास
Follow us on

भिवंडी : भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड-19 रुग्णालयाबाहेर (Bhiwandi Corona Patient) एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महानगरपालिका कर्मचारी वसाहतीतील नागरिकांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर या कोरोना रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या रुग्णावर मुंबईतील नायर रुग्णालयात (Bhiwandi Corona Patient) उपचार सुरु होते.

रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, तो नायर रुग्णालयातून रुग्णवाहिकेने ठाणे येथे आला. तिथून पुढे एक ट्रकमध्ये बसून ठाणे-भिवंडी बायपास रस्त्यावरील राजनोली नाका या ठिकाणी उतरला. त्यानंतर तो पायी प्रवास करत स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयापर्यंत पोहोचला.

करोनाबाधित रुग्णांबाबत सर्वच स्तरावर विशेष काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलं, प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, भिवंडीत प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांवर माती टाकणारा प्रकार घडला.

भिवंडी शहरात 22 एप्रिलच्या पहाटे 51 वर्षीय किडनी विकाराने त्रस्त रुग्ण खाजगी लॅबच्या अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने त्याला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड-19 या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं. या रुग्णाला डायलेसिस आवश्यक असल्याने 22 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता त्याला मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यावेळी रुग्णाची भाचीसुद्धा त्याच्यासोबत नायर रुग्णालयात आल्याने तिला क्वारंटाईन करण्यात आले.

त्यानंतर 23 एप्रिलला सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास हा रुग्ण स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड-19 रुग्णालयाजवळील परिसरात आढळून आला. रुग्णालयाजवळील कर्मचारी वसाहत परीसरात हा रुग्ण सुमारे पाऊण तास होता. त्यानंतर वसाहतीमधील रहिवाशांनी विचारपूस केली असता तो कोरोना रुग्ण असल्याचं आढळून आलं. त्यानंतर नागरिकांनी थेट रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून याची माहिती दिली. डॉक्टरांनी तात्काळ या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल (Bhiwandi Corona Patient) करुन घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड-19 रुग्णालायाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. रुग्णालय इमारतीच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने रुग्णांना रुग्णवाहिकेतून आणले जाते. या रस्त्याबाजूला महानगरपालिका कर्मचारी वसाहतीच्या तीन इमारती आहेत, ज्यामध्ये एकूण 48 कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. रुग्णालय प्रशासनाचं कोरोना रुग्णांकडे दु्र्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

हा रुग्ण नायर रुग्णालयाच्या बाहेर पडला कसा, त्याच्याकडे ट्रान्स्फर लेटर नव्हते, मग सुरक्षा रक्षकाने त्याला अडविले कसे नाही, त्याला रुग्णवाहिका कोणी दिली आणि रुग्णवाहिका चालक त्याला रस्त्यावर उतरवून कसा काय गेला, अशे प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत. या प्रकरणी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देत या प्रकरणी चौकशी (Bhiwandi Corona Patient) करण्याची मागणी केली आहे.