चंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड, 24 ट्रक पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Feb 22, 2020 | 11:27 PM

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन तब्बल 24 ट्रक ताब्यात घेतले आहेत

चंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड, 24 ट्रक पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड झालं आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन तब्बल 24 ट्रक ताब्यात घेतले आहेत (Big coal racket in Chandrapur). शहराजवळील नागाळा गावातील एका बड्या कोळसा व्यापाऱ्याच्या कोळसा साठा क्षेत्रात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील पोवनी कोळसा खाणीतून हे ट्रक निघाले होते. त्यांना राज्यातील विविध लघु उद्योगात जायचं होतं. कारवाई झालेल्या तळावर उच्च दर्जाचा कोळसा उतरवून ट्रकमध्ये चुरी भरली जात असल्याची शंका होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सध्यातरी 600 टन कोळसा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. पुरवठादार आणि अंतिम खरेदीदार यांच्यातील साखळी जुळवून पोलीस घोटाळ्याची चौकशी करत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली.

जप्त करण्यात आलेले ट्रक लघु उद्योगांना सबसिडीमध्ये मिळणारा कोळसा काळ्याबाजारात नेत असल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सबसिडीच्या माध्यमातून लघु उद्योगांना मिळणारा कोळसा काळ्या बाजारात विकण्याचा प्रकार सुरु आहे का? यातून सरकारला आर्थिक स्वरुपात मोठा चुना लावण्याचं षडयंत्र सुरु आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत पोलीस तपास सुरू असतानाच आता यावरुन राजकीय आरोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात गृहमंत्र्यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे या घोटाळ्यात सहभागी व्यापाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

नागाळा येथे ट्रक जप्तीला 5 दिवस झाले असूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र हा कोळसा कोणत्या व्यापाऱ्याचा होता? आणि तो कुठे जात होता? याबाबत गूढ वाढले आहे.

Big coal racket exposes in Chandrapur