विदर्भ जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अकोला,वाशीम,बुलढाणा दौरा

एकीकडे विदर्भात यंदा लोकसभा निवडणूकात कॉंग्रेसला आश्चर्यकारकपणे मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकात कॉंग्रेसला विदर्भात जादा जागा मिळण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येत्या 12 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत.

विदर्भ जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अकोला,वाशीम,बुलढाणा दौरा
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप
Image Credit source: Facebook
| Updated on: Sep 11, 2024 | 9:35 PM

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून  विदर्भ जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जाणार असून विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तीन दिवसांचा दौरा करून चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात ते मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार  चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार दि. १२ सप्टेंबर ते शनिवार दि. १४ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.

* १२ सप्टेंबरला अकोला जिल्हा दौरा

गुरुवार दि. १२ रोजी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे अकोला जिल्हा दौऱ्याची सुरवात मूर्तीजापूर येथून करतील. सकाळी १० वा. येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी २.०० वा. आकोट येथील सत्यम पॅलेस हॉटेल येथे आकोट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. ५ वा. अकोला येथील जलसा रिसॉर्ट रिधोरा बाळापूर रोड येथील अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायं. ७.०० वा. पारस येथील न्यू क्लब बिल्डिंग औष्णिक वीज केंद्र, पारस येथे बाळापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

* १३ सप्टेंबरला वाशीम जिल्हा दौरा

शुक्रवार दि. १३ सप्टेंबरला वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील जी.बी. लॉन येथे रिसोड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी २.०० वा. वाशीम शहरातील परशुराम भवन, जुनी नगर पालिका रोड, आंबेडकर मार्ग येथे वाशीम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. ५.०० वा. मानोरा येथील ठाकरे पॅलेस, लालमाती, मंगरूळपीर रोड येथे कारंजालाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

* १४ सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौरा

शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे चिखली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी २.०० वा. मलकापूर येथील भाजपा कार्यालय गणपती नगर येथे मलकापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ५.०० वा. खामगाव येथील तुळजाई हॉटेल, पंचायत समिती समोर येथे खामगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.