दिवाळीनिमित्त घराची ओढ, बस प्रवासाची सर्वाधिक मागणी असलेले महाराष्ट्रातील दहा मार्ग

रेडबसच्या डेटानुसार, पुणे-नागपूर हा महाराष्ट्रात दिवाळीच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेला मार्ग आहे.

दिवाळीनिमित्त घराची ओढ, बस प्रवासाची सर्वाधिक मागणी असलेले महाराष्ट्रातील दहा मार्ग

मुंबई : दिव्यांचा सण जवळ येऊ लागला आहे आणि यंदा अवघ्या महाराष्ट्राने हा सण कुटुंबियांसोबत साजरा करण्याचा निश्चय केल्याचं दिसत आहे. पुणे आणि नागपूर या शहरांदरम्यानचा मार्ग हा महाराष्ट्रात दिवाळीच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेला मार्ग आहे. (Busiest Road route on Maharashtra is Pune Nagpur)

वर्षात सर्वाधिक प्रवास होणाऱ्या दिवाळीच्या काळातील प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी 435 खासगी बस ऑपरेटर्सनी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) साथीने कंबर कसली आहे. सुमारे दहा हजार दैनंदिन फेऱ्या चालवल्या जात आहेत. या फेऱ्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या आठवड्यात सुमारे पाच लाख प्रवाशांचे परिवहन होणे अपेक्षित आहे. या प्रवासाचे एकत्रित अंतर 5.5 कोटी किलोमीटर होईल असा अंदाज आहे.

‘रेडबस’ या भारतातील सर्वांत मोठ्या ऑनलाईन बस तिकिटिंग प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत झालेल्या जोरदार आंतरशहर बस आरक्षणांतून स्पष्ट दिसत आहे. दिवाळी 14 नोव्हेंबरला सुरु होत असून, रेडबसवर दिवाळीसाठी 14 दिवस आधीपासूनच बुकिंग सुरु झाले होते.

रेडबसने आतापर्यंत जाहीर केलेल्या डेटानुसार, पुणे आणि नागपूर या शहरांदरम्यानचा मार्ग हा महाराष्ट्रात दिवाळीच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेला मार्ग आहे.

दिवाळी काळातील सर्वाधिक मागणीचे मार्ग (2020)

पुणे-नागपूर
पुणे-लातूर
पुणे-जळगाव
मुंबई-कोल्हापूर
मुंबई-औरंगाबाद
पुणे-कोल्हापूर
पुणे-इंदोर
पुणे-अमरावती
मुंबई-हैदराबाद
पुणे-सोलापूर

दिवाळी काळातील सर्वाधिक मागणीचे मार्ग (2019)

पुणे-नागपूर
पुणे-नाशिक
पुणे-औरंगाबाद
पुणे-कोल्हापूर
पुणे-मुंबई
पुणे-इंदोर
पुणे-लातूर
पुणे-हैदराबाद
पुणे-धुळे
पुणे-जळगाव

सध्याच्या बुकिंग्जपैकी सुमारे 70% राज्यांतर्गत प्रवासासाठी आहेत, तर 30% आंतरराज्य प्रवासासाठी आहेत. सध्याच्या बुकिंग्जपैकी 76% बुकिंग्ज वातानुकूलित बसेससाठी करण्यात आली आहेत. रेडबसवर प्रवासासाठी उच्च मागणी असलेल्या महाराष्ट्रातील आघाडीच्या पाच शहरांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.

यंदाच्या दिवाळीत बुकिंग झालेला सर्वांत लघु आंतरशहर बसमार्ग शेगाव आणि खामगाव या दोन शहरांदरम्यानचा मार्ग आहे. हा मार्ग 17.5 किलोमीटर्सचा असून, हे अंतर 25 मिनिटांत कापले जाते. सर्वांत दीर्घ मार्ग मुंबई आणि पाटणा यांदरम्यानचा आहे. महाराष्ट्रातून बिहारमध्ये जाणारा हा मार्ग 1722 किलोमीटर्सचा असून 36 तासांत कापला जातो.

सणासुदीच्या गर्दीतही सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने केला जात आहे. रेडबसद्वारे मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यांच्या सेफ्टी प्लस कार्यक्रमातील नियम बस ऑपरेटर्स आणि प्रवासी दोघांनाही लागू आहेत. त्यानुसार, सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना प्रवास करत असताना मास्क घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहनामध्येच हात निर्जंतुक करण्याच्या सुविधा देणे आवश्यक आहे. बसमध्ये चढताना शरीराचे तापमान तपासले जाईल आणि ऑपरेटर्स चादरी वगैरे (लिनन) पुरवणार नाहीत.

प्रत्येक फेरीनंतर प्रस्थापित नियमांनुसार बसेसचे निर्जंतुकीकरण केले जाईल. पार्टनर बस ऑपरेटर्स प्रवाशांना सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षिततेचे काटेकोर उपाय लागू करतील याची खात्री सेफ्टी प्लस करत आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी जबाबदारीने वागण्यास प्रोत्साहन देण्यासाठी रेडबसने सूचनांची यादी तयार केली आहे. आंतरशहर बस प्रवासासाठी वाढलेली मागणी सणासुदीच्या काळानंतरही टिकून राहणे अपेक्षित आहे. कारण, बसप्रवास हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

संबंधित बातम्या :

एसटीचं खासगीकरण करणार नाही, 6 महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं : अनिल परब

प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या

(Busiest Road route on Maharashtra is Pune Nagpur)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI