चंद्रपुरात पुन्हा ‘उभी बाटली’, दारुबंदी हटवण्याच्या ठाकरे सरकारच्या हालचाली

एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 200 दारु विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते

चंद्रपुरात पुन्हा उभी बाटली, दारुबंदी हटवण्याच्या ठाकरे सरकारच्या हालचाली
| Updated on: Jan 15, 2020 | 10:27 AM

मुंबई : 2015 मध्ये भाजपने चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली दारुबंदी अवघ्या पाच वर्षांत निकालात निघण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडी सरकार चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. शेकडो कोटींचा महसूल बुडाल्याने ठाकरे सरकार दारुबंदी काढण्याच्या (Chandrapur Liquor Ban Revoke) विचारात आहे.

एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 200 दारु विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. मात्र ‘मागच्या दाराने’ चंद्रपुरात दारुविक्री सुरुच होती. अगदी गाड्यांच्या डिकीत लपवून आणि देवघरात देवाच्या मूर्तीखाली दडवून दारुचा अवैध व्यापार सुरु होता. दारुबंदीमुळे बेकायदा विक्री अंदाजे दहापटीने वाढली होती.

दारुबंदीमुळे गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बेकायदा विक्रीमुळे महसूल बुडत असल्याचं निरीक्षण समोर आल्यानंतर महसूलवाढीसाठी ठाकरे सरकारने दारुबंदी हटवण्याचा फंडा वापरला आहे.

विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांतील तूट भरुन काढण्याचीही जबाबदारी असल्यामुळे राज्यात दारु विक्रीची वेळही तासाभराने वाढवण्यात येणार आहे. आता चंद्रपुरातील ‘तळीराम’ खुश होतील, मात्र ‘बाटली आडवी’ अर्थात दारुबंदी करण्यासाठी राबणाऱ्या महिलावर्गाची काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणं महत्त्वाचं (Chandrapur Liquor Ban Revoke) आहे.