
छत्तीसगडातील दुर्ग जिल्ह्यातील एका कबड्डीपटूने इन्स्टाग्रामवर लाइव्ह करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुम्हारी येथे राहणारा हा अल्पवयीन खेळाडू आहे. तो आधी जंगलात गेला. तिथे इन्स्टाग्रामवर लाइव्ह केलं आणि आयुष्य संपवलं. विलासपूरच्या जंगलात ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना या आत्महत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच कुटुंबीय जंगलाच्या दिशेने धावतपळत गेले.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीसही हादरले. व्हिडीओ व्हायरल झाल्याने बिलासपूर जिल्हा अंतर्गत सोरवा पोलीस ठाणे क्षेत्रातील पोलीस जंगलात गेले. पोलीस जंगलात या अल्पवयीन खेळाडूचा मृतदेह तासभर शोधत होते. त्याचं शेवटचं लोकेशन 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये सापडलं. पोलिसांनी खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर त्याची बॉडी जप्त केली.
वाचा: जावई सासूशी लग्न करून पोहोचला गावात, मुलाच्या पत्नीला पाहून वडील म्हणाले ‘आता तू…’
आधी बिलासपूर गाठले, नंतर जंगल
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तासभर हा मृतदेह शोधत होते. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. तीन दिवसांपूर्वी हा खेळाडू बिलासपूरला गेला होता. त्यानंतर 17 एप्रिलला जंगलात जाऊन त्याने स्वत:ला संपवलं. आयुष्याचा अंत करण्यापूर्वी त्याने लाइव्ह व्हिडिओ केला होता. त्यानंतर त्याने आयुष्य संपवलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे कुटुंबीय आधी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर पोलिसांसोबत जंगलात गेले.
कुटुंबीयांना धक्का
कुम्हारी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिलासपूरच्या ज्या जंगलात या तरुणाने जीवन संपवलं त्या जागेची ओळख पटली आहे. हा 17 वर्षाचा खेळाडू जांजगिरीचा रहिवासी होता. कबड्डी खेळायला जातोय असं सांगून तो घरातून निघाला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. मुलाने अचानक जीव दिल्याने त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. काय करावं आणि काय नाही असं त्यांना झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. या खेळाडूचा मोबाईल जप्त केला असून त्यातून माहिती घेतली जात आहे. याशिवाय त्याच्या मित्रांचीही चौकशी केली जाणार आहे. तसेच बिलासपूरला तो कुठे गेला होता? कुणाला भेटला होता? या भेटीत काय झालं होतं? याची माहितीही पोलीस घेत आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.