Ahmed Patel | काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये

| Updated on: Nov 15, 2020 | 5:06 PM

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Ahmed Patel | काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांची प्रकृती खालावली आहे. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Congress leader Ahmed Patel in ICU weeks after being infected with coronavirus)

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची रवानगी मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये केल्याची माहिती कुटुंबीयांनी रविवारी दिली.

“अहमद पटेल यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगू इच्छितो, की आमचे वडील काही आठवड्यांपूर्वी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे” असे अहमद यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटरवरुन सांगितले.

“अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख सुरु आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा” अशी विनंतीही फैजल पटेल यांनी केली.

कोण आहेत अहमद पटेल?

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार आहेत. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली आहे. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना आहे.

जेव्हा पक्षहिताचा प्रश्न येतो, तेव्हा सोनिया गांधी या राहुल गांधींपेक्षाही अहमद पटेल यांच्यावर अवलंबून असतात असं म्हटलं जातं. अहमद पटेल हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून पक्षात आहेत. 1977 मध्ये काँग्रेस तोंडघशी पडलेली असताना संसदेत पोहचणाऱ्या मोजक्या काँग्रेस खासदारांमध्ये अहमद पटेल यांचा समावेश होतो.

1980 मध्ये काँग्रेसने पुनरागमन केलं, तेव्हा इंदिरा गांधींनी अहमद पटेलांना कॅबिनेट मंत्रिपद ऑफर केलं, मात्र पटेल यांनी पक्षबांधणीला प्राथमिकता दिली होती.

अहमद पटेल हे तीन वेळा लोकसभेवर, तर चार वेळा राज्यसभेवर खासदारपदी निवडून आले आहेत.

संबंधित बातम्या :

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं नाव

(Congress leader Ahmed Patel in ICU weeks after being infected with coronavirus)