नाशिकमध्ये विश्वास नांगरे पाटलांना गुन्हेगारांचं थेट आव्हान?

| Updated on: Jun 11, 2019 | 7:32 PM

नाशिकमध्ये मागील काही काळापासून गुन्ह्यांच्या घटना वाढवत आहेत. यातून एकप्रकारे थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नांगरे पाटलांसमोर ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आहे.

नाशिकमध्ये विश्वास नांगरे पाटलांना गुन्हेगारांचं थेट आव्हान?
Follow us on

नाशिक: शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न पडण्याएवढी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंडांकडून गाड्यांची तोडफोड, चेन स्नॅचिंग या घटना रोजच्याच होऊन बसलेल्या असतानाच, आता थेट पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर नाशिककरांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ करावा, अशी अपेक्षा नाशिककर करत आहेत.

नाशिक शहरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सध्या नाशिककरांना पडतो आहे. एकीकडे शहरांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे शहरातील गुंडांची मजल आता थेट पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत पोहचली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला, तर चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड, पोलिसांवरील हल्ले अशा घटना कधी नव्हे त्या शहरात घडत आहेत.

पोलीस मुख्यालयातील एटीम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न, नाशिक रोड परिसरात 6 गाड्यांची तोडफोड, पाथर्डी भागात 2 दुचाकी गाड्यांची जाळपोळ, पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, पोलीस कर्मचाऱ्यांवर टोळक्याचा हल्ला अशा सलग घटना मागील काळात घडल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची जरब राहिली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमीही झाले होते. मागील 2 दिवसात 4 चारचाकी गाड्या फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटल्याच्याही घटना घडल्या आहेत.

या सर्व घटना कमी होत्या म्हणून की काय आता थेट पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातूनच चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे जेथे पोलिसच सुरक्षित नाहीत, तेथे नागरिकांची काय अवस्था अशी परिस्थिती तयार झाली आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जोमात कारवाई सुरु केली. मात्र, गुन्हेगारांनी गुन्ह्यांच्या घटना वाढवत एक प्रकारे या घटनांच्या माध्यमातून थेट त्यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नांगरे पाटील यांच्यासमोर ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आहे.