डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, साबरमती आश्रम, ताज महालला भेट, कसा असेल कार्यक्रम?

| Updated on: Feb 24, 2020 | 8:44 AM

डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर

डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, साबरमती आश्रम, ताज महालला भेट, कसा असेल कार्यक्रम?
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump India Tour) येणार आहेत. ते सकाळी 11.40 वाजता अहमदाबादला पोहोचतील. ट्रम्प हे भारत दौऱ्यासाठी अत्यंत उत्साहित आहेत. “मी भारतीयांना भेटण्यासाठी अत्यंत उत्साहित आहे. आम्ही लाखो लोकांना भेटू. मला पंतप्रधान मोदींसोबत चांगलं वाटतं, ते माझे मित्र आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं ही (Donald Trump India Tour) आतपर्यंतचा सर्वात मोठा इव्हेंट असेल. मी आशा करतो की भारताचा दौरा मोठा इव्हेंट असेल. कदाचित सर्वात मोठा इव्हेंट”.

डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर येत आहेत.

पंतप्रधान मोदी स्वागतासाठी विमानतळावर

डोनाल्ड ट्रम्प हे अहमदाबादच्या सरदार वल्लभ भाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांचं स्वागत करतील. त्यानंतर एका भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर ट्रम्प 12.15 वाजताच्या सुमारास साबरमती आश्रम येथे पोहोचतील.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारत सज्ज

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प जेव्हा विमानतळावरुन मोटेरा स्टेडियमजवळ पोहोचतील तेव्हा रोड शो दरम्यान शाळेतील विद्यार्थी निरनिराळे कार्यक्रम सादर करतील. रोड शो दरम्यान गरबा, देशभक्तीपर गाणी, जवानांच्या वेशभूषेत कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचं सादरीकरण होईल.

आग्रामध्ये तीन हजार कलाकार ट्रम्प यांचं स्वागत करणार

ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी 1.05 वाजता अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण होईल. येथे ट्रम्प लाखो भारतीयांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता ट्रम्प आणि मेलानिया आग्य्राकडे निघतील. डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 5.15 वाजताच्या सुमारास जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालला भेट देतील. त्यांच्या स्वागतासाठी तीन हजार कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. यादरम्यान, रासलीला, रामलीला आणि नाटक असे विविध कार्यक्रम सादर होतील. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.

दिल्लीत मुक्काम

दिल्लीत आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, त्याच्या सुरक्षेसाठीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लष्कर, निमलष्करी दले आणि अमेरिकेची सुरक्षा असं नियोजन करण्यात आलं आहे. ट्रम्प आणि मेलेनिया यांचे स्वागत केले जाईल. तिथल्या चाणक्य या सूटमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रम्प यांना सोन्याच्या ताटात जेवण आणि चांदीच्या पेल्यात चहा दिला जाणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात येईल. त्यानंतर 10.30 वाजता राजघाटवर जाऊन ट्रम्प राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पाजंली अर्पण करतील. सकाळी 11 वाजता ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक औपचारिक बैठक होईल. त्यानंतर मोदी आणि ट्रम्प सोबत दुपारचं जेवण घेतील. ट्रम्प हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह रात्रीचं जेवण घेतील (Donald Trump India Tour). त्यानंतर रात्री 10 वाजता ते अमेरिकेसाठी रवाना होतील.