राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग

| Updated on: Jun 13, 2019 | 7:59 AM

सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला बुधवारी रात्री आग लागली. नागपूरच्या नरखेड स्थानकाजवळ या गाडीला अचानक आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग
Follow us on

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला बुधवारी  (12 जून) रात्री आग लागली. नागपूरच्या नरखेड स्थानकाजवळ या गाडीला अचानक आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली. आगीत गाडीची पावर कार जळून खाक झाली. मात्र, गार्डच्या सतर्कतेमुळे ही आग इतर डब्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे मोठं नुकसान होण्यापासून वाचलं.

12437 राजधानी एक्स्प्रेस ही सिकंदराबादहून निजामुद्दीनकडे जात होती. नागपूरनंतर पुढील थांबा हा भोपाळ होता. दरम्यान नरखेड स्थानकाजवळ पावर कारमध्ये असलेल्या गार्डला धूर दिसला. त्याने तात्काळ याची माहिती पुढच्या डब्यातील गार्ड आणि पायलटला दिली. त्यानंतर ट्रेनला पांढुर्णाच्या अगोदर येणाऱ्या ढाडीमेट स्थानकाजवळ पावर ब्रेक लावून थांबवण्यात आलं.

या घटनेची माहिती स्टेशन मास्टर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अग्नीशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवलं. पावर कारला गाडीपासून वेगळं करुन तब्बल दोन तासांनी गाडीला पुढील प्रवासासाठी सोडण्यात आलं. गार्डच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना होता होता टळली.

जनरेटर बोगीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच गाडीत खळबळ उडाली. घाबरलेले प्रवासी गाडीतून खाली उतरले. त्यानंतर पावर कारला वेगळं केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. राजधानी एक्स्प्रेस तब्बल दोन तास जागेवर उभी होती, त्यामुळे त्यानंतरच्या अनेक गाड्या उशिराने धावल्या.