ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

| Updated on: Nov 02, 2020 | 7:20 PM

केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही. | Raju Shetty

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
Follow us on

कोल्हापूर: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली तर साखरेचा एक कणही कारखान्यांतून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा. केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. (Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)

कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांना 14 टक्के वाढीव एफआरपी देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने एफआरपी 100 रूपयांनी वाढवला आहे. परंतु, 14 टक्क्यानुसार एफआरपीची रक्कम 382 रुपयांनी वाढली पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान 200 रुपयांनी तरी एफआरपी वाढवावा.

याबाबतीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या एफआरपीसंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांंशीही चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली होती. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बैठकीतून निघून गेले. त्यामुळे ऊसदर निश्चितीसाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली. मात्र, ऊसासाठी एफआरपी वाढवून देणार नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु होऊन देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला होता.

कृषी कायद्यांविरोधात 5 नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन
येत्या 5 नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून ठिकठिकाण रस्ता रोखून धरू. किमान दोन तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

अतिवृष्टीमुळे ऊसतोडणीच्या कामात अडथळे

काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. परिणामी या शेतांमधील ऊस तोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या रस्त्यांलगत असलेल्या शेतांमधील ऊस कापण्याचे काम सुरु आहे. मात्र, यंदाचा गाळप हंगाम अगोदरच लांबणीवर पडला आहे. दरवर्षी साधारण 15 ऑक्टोबरच्या आसपास गाळप हंगामाला सुरुवात होते. मात्र, यंदा अडचणींमुळे गाळप हंगाम अजूनही सुरु झालेला नाही.

संबंधित बातम्या:

साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप

(Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)