शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये, मोदी सरकारची घोषणा, पुढच्या आठवड्यात रक्कम जमा होणार

| Updated on: Mar 26, 2020 | 3:08 PM

मोदी सरकारने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1.70 लाख कोटीचं पॅकेज (Corona Package for Farmers) जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये भरले जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये, मोदी सरकारची घोषणा, पुढच्या आठवड्यात रक्कम जमा होणार
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1.70 लाख कोटीचं पॅकेज (PM Kisan Yojana package for farmers ) जाहीर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत (PM Kisan Yojana package for farmers )  याबाबतची घोषणा केली. कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असताना एकही जण उपाशी राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यानुसार गरिबांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी ५ किलो गहू/तांदूळ आणि १ किलो डाळ मोफत मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठीही मोदी सरकारने घोषणा केली आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील निधीचा पहिला हप्ता त्वरित देण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 8.69 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येणार आहे.

“१३० कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो, त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये भरणार आहोत. देशातील ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे २ हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील”, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

गृहलक्ष्मींना दिलासा

आठ कोटी 30 लाख कुटुंबांना ‘उज्ज्वला गॅस योजने’ अंतर्गत पुढचे तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार आहे. 63 लाख महिला बचत गटांना 10 लाखांऐवजी 20 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्जपुरवठा केला जाणार आहे. याचा लाभ 7 कोटी कुटुंबांना होणार आहे. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान  मिळेल.

निर्मला सीतारमन यांच्या महत्त्वाच्या घोषणा (Corona Package announcement for women)

1. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
3. देशात कोणही उपाशी राहणार नाही
4. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
5. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
6. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत
7. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
8. आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार
9. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार
10. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
11. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा
12. तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना 1 हजार रु.सानुग्रह अनुदान
13. दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान
14. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान
15. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर
16. आठ कोटी 30 लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 3 महिने मोफत सिलिंडर
17. 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा, 7 कोटी कुटुंबांना लाभ
18. 100 पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार 3 महिने भरणार