पालघर हत्याप्रकरणात अटकेतील एकही मुस्लिम नाही, गृहमंत्र्यांकडून 101 आरोपींची नावं जाहीर

घटनेनंतर आठ तासात पोलिसांनी 101 जणांना ताब्यात घेतलं. त्यांची यादी आज जाहीर करत आहे. त्यापैकी एकही मुस्लीम बांधव नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं (Home Minister Anil Deshmukh on Palghar Mob Lynching)

पालघर हत्याप्रकरणात अटकेतील एकही मुस्लिम नाही, गृहमंत्र्यांकडून 101 आरोपींची नावं जाहीर
| Updated on: Apr 22, 2020 | 11:02 AM

मुंबई : पालघरची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या तिहेरी हत्येचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 101 जणांमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गेल्या आठवड्यात पालघरमधील गडचिंचले पाड्यात जमावाने केलेल्या मारहाणीत दोन साधूंसह त्यांच्या वाहनचालकाला प्राण गमवावे लागले होते. (Home Minister Anil Deshmukh on Palghar Mob Lynching)

पालघरमधील आदिवासी भागामध्ये घडलेली हत्येची घटना दुर्दैवी आहे. दुर्गम भागातील गावात चोर शिरल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. वेषांतर करुन लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा आदिवासी भागामध्ये पसरली होती, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

घटनेनंतर आठ तासात पोलिसांनी 101 आरोपींना जंगलातून शोधून ताब्यात घेतलं. त्यांची यादी आज जाहीर करत आहे. त्यापैकी एकही मुस्लीम बांधव नाही. तिन्ही साधू ‘ओये बस’, ‘ओये बस’ म्हणत होते, मात्र त्याचा ‘शोएब’ असा विपर्यास केला. त्यामुळे जातीचा रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करु नका, असं देशमुखांनी सुनावलं. या घटनेचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ही राजकारण करण्याची वेळ नाही. आपण सगळे ‘कोरोना’शी लढत आहोत. अशात मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे. परंतु एकत्र येऊन सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन देशमुख यांनी सरकारतर्फे विरोधकांना केलं.

वाधवान कुटुंबाला सीबीआयकडे सोपवणार

वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनमध्येही एका अधिकाऱ्याने महाबळेश्वरला जायला परवानगी दिली होती. त्या वाधवान कुटुंबाचा क्वारंटाइन कालावधी आज दुपारी दोन वाजता संपणार आहे. आम्ही अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

सीबीआयचे अधिकारी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना नेतील, तोपर्यंत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहतील. त्यांची पुढील चौकशी सीबीआय करेल. 15 दिवसांपासून ते क्वारंटाइनमध्ये आहेत. मधल्या काळात लंडनला पळाल्याचं म्हटलं गेलं, ते चुकीचं असल्याचंही गृहमंत्री म्हणाले.