देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?

| Updated on: Jul 17, 2019 | 8:16 PM

भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. भारताची बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळे तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हरिश साळवेंचं अभिनंदनही केलंय.

देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?
Follow us on

हेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. भारताची बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळे तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हरिश साळवेंचं अभिनंदनही केलंय.

देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. पण कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं. तर संपूर्ण दिवसासाठी त्यांची फी 30 लाख रुपयांपर्यंत सांगितली जाते. दिल्लीतील भगवान दास रोडवरील व्हाईट हाऊसमध्ये हरिश साळवे यांचं कार्यालय आहे. तर ते ज्या घरात राहतात, त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जाते.

हरिश साळवेंची कारकीर्द

बॅरिस्टर हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43 व्या क्रमांकावर आहे. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. घरातूनच वकिलीचं बाळकडू मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. 1992 मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि 1999 मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

सलमान खानलाही वाचवलं

मुंबई सेशन्स कोर्टाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सलमान आणि कुटुंबीयांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. सलमानला थेट तुरुंगात नेलं जाणार असल्याचीही चर्चा झाली. मात्र तेव्हाच वरिष्ठ वकील हरिश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला. हरिश साळवे खास सलमानसाठी दिल्लीतून मुंबईत आले होते.

मोठ्या खटल्यांचा अनुभव

कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली आणि त्यांचं नाव देशभरात गाजलं. केंद्र सरकारसोबतच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली होती. इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली. सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली होती.