आयकर विभागाची मोठी कारवाई, मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त

| Updated on: Jul 18, 2019 | 3:14 PM

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई  केली आहे. आज आयकर विभागाने त्यांची 400 कोटींची बेनामी जमीन जप्त केली.

आयकर विभागाची मोठी कारवाई, मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त
Follow us on

नवी दिल्ली: बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई  केली आहे. आज आयकर विभागाने त्यांची 400 कोटींची बेनामी जमीन जप्त केली.

आयकर विभागाने आज मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी सुरु केली होती. यात त्यांना आनंद कुमार यांची नोएडात 28 हजार 328 स्क्वेअर मीटर इतकी जमीन असल्याचे समजले. 7 एकरच्या या प्लॉटची बाजारातील किंमत जवळपास 400 कोटी रुपये आहे.

आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांचा हा बेनामी प्लॉट जप्त करण्याचे आदेश 16 जुलै रोजी देण्यात आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आनंद कुमार यांच्या आणखी बऱ्याच बेनामी संपत्तीची माहिती आयकर विभागाकडे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येणाऱ्या काळात या संपत्तीवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईची झळ थेट मायावतींनाही लागू शकते, असेही बोलले जात आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागासह सक्तवसुली संचलनालय (ईडी) देखील करत आहे.

मायावतींच्या भावाची पार्श्वभूमी

मायावतींचा भाऊ आनंद कुमार नोएडा प्राधिकरणात सामान्य क्लर्क होता. मात्र, मायावती सत्तेवर येताच आनंद कुमार यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाली. त्यांच्यावर बनावट कंपनी तयार करुन कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर आनंद कुमार यांनी एका मागून एक 49 कंपनी सुरु केल्या. पाहता पाहता 2014 पर्यंत ते 1 हजार 316 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले.