‘लेह चीनचा भाग नाही, तर भारताच्या लडाखची राजधानी’, चुकीच्या GEO टॅगवरुन भारतानं ट्विटरला सुनावलं

| Updated on: Oct 22, 2020 | 5:13 PM

ट्विटरवर भारताचा भाग चीनमध्ये दाखवण्यावरुन भारताने तीव्र आक्षेप घेत ट्विटरला सुनावलं आहे.

‘लेह चीनचा भाग नाही, तर भारताच्या लडाखची राजधानी’, चुकीच्या GEO टॅगवरुन भारतानं ट्विटरला सुनावलं
Follow us on

नवी दिल्ली : ट्विटरवर भारताचा भाग चीनमध्ये दाखवण्यावरुन भारताने तीव्र आक्षेप घेत ट्विटरला सुनावलं आहे. या प्रकरणी भारत सरकारचे आय टी सचिव अजय साहनी यांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात साहनी यांनी ट्विटरला कठोर इशारा दिला आहे. तसेच ट्विटरच्या अशा कृतींमुळे ट्विटरची केवळ प्रतिष्ठा कमी होत नाही, तर तटस्थता आणि निष्पक्षपणा यावरही प्रश्न उपस्थित होतात. भारताच्या आक्षेपानंतर ट्विटरने आपली चूक मान्य केली आहे (Indian Government letter to Twitter CEO Jack Dorsey over showing Leh in China).

ट्विटरने 18 ऑक्टोबरला आपल्या प्लॅटफॉर्मवर लेहचं जिओ-टॅग लोकेशन चीनच्या ताब्यातील जम्मू काश्मिरमध्ये दाखवलं होतं. यानंतर आय टी सचिवांनी ट्विटरला लेह भारताच्या केंद्र शासित प्रदेश लडाखची राजधानी असल्याचं स्पष्ट केलं. तसेच हे ट्विटरला माहिती असायला हवं, असंही सुनावलं. लडाख आणि जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य भाग आहे. या भागात भारताच्या संविधानाप्रमाणे काम होत असल्याचंही ट्विटरला सांगण्यात आलं.

भारताचा कोणताही अपमान सहन करणार नाही : अजय साहनी

अजय साहनी म्हणाले, “ट्विटरने भारताच्या नागरिकांच्या भावनांचा सन्मान करावा. नकाशातून दिसणारी भारताची अखंडता आणि स्वायत्तता यावर ट्विटरकडून होणारा अपमान भारत सहन करणार नाही. हे कायद्याचं देखील उल्लंघन आहे.”

भारताने ट्विटरच्या या कृतीवर आक्षेप घेत पाठवलेल्या पत्राची ट्विटरकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. तसेच ट्विटर भारत सरकारसोबत काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा आम्ही सन्मान करतो. पत्रातील मुद्द्यांवर लक्ष देण्यात येईल, असं आश्वासन ट्विटरने दिलं आहे.

हेही वाचा :

Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, कोट्यावधी युजर्सला फटका

Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक

Indian Government letter to Twitter CEO Jack Dorsey over showing Leh in China