’28 व्या क्रमांकावरील पिछाडीचं राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवतंय’, केसीआर यांचा आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Nov 29, 2020 | 4:52 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

28 व्या क्रमांकावरील पिछाडीचं राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवतंय, केसीआर यांचा आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल
Follow us on

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादमध्ये प्रचारसभा घेऊन नाव बदलण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केसीआर यांनी त्यांना फटकारलं आहे. देशात दरडोई उत्पन्नाबाबत 28 व्या क्रमांकावर असलेलं पिछाडीवरील राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवण्याचा प्रयत्न करतंय, असं म्हणत केसीआर यांनी खोचक टोला लगावला. तसेच हैदराबादमध्ये काही विभाजनवादी शक्ती शिकाव करत असल्याचं सांगत हैदराबादला वाचवा, असं आवाहन जनतेला केलं आहे. ते हैदराबादमधील एल. बी. स्टेडियमवर बोलत होते.

केसीआर म्हणाले, “काही विभाजनवादी शक्ती हैदराबादमध्ये शिरकाव करत आहेत आणि येथील शांतता बिघडवत आहेत. आपण त्यांना हे करु देणार आहोत का? आपण आपली शांतता भंग होऊ देणार आहोत का? तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून मी हैदराबादमधील जनतेला आवाहन करतो की त्यांनी पुढे यावं आणि टीआरएस या पुरोगामी विचाराच्या पक्षाला पाठिंबा द्यावा. हैदराबादला विभाजनवादी पक्षांपासून वाचवा.”

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टोला लगावताना केसीआर म्हणाले, “देशात दरडोई उत्पन्नात 28 व्या क्रमांकावर असलेलं पिछाडीवरील राज्य या यादीत 5 व्या क्रमांकावर आघाडीवर असलेल्या राज्याला शिकवण्याचा प्रयत्न करतंय. ही महानगरपालिकेची निवडणूक आहे की देशाची? भाजपचे केंद्रीय स्तरावरील नेतेही या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी येत आहेत.”

“हैदराबादच्या पुरावेळी 1300 कोटींची मागणी, केंद्र सरकारने 13 रुपयेही मदत दिली नाही”

“हैदराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली तेव्हा तेलंगणा सरकारने 1300 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने 13 रुपये देखील मदत केली नाही. दुसरीकडे मोदी सरकार एलआयसी, रेल्वे आणि भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्ससारख्या (BHEL) नफ्यातील यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या सरकारी कंपन्या विकत आहेत,” असंही केसीआर यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या :

एकदा भाजपला संधी द्या, हैदराबादमधील सगळी बेकायदेशीर कामं हटवू, परत कधी पाणी साचणार नाही : अमित शाह

तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे भाग्यनगर होणार नाही, ओवेसींचा आदित्यनाथांना इशारा

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना

‘मोदींनाही प्रचाराला आणा, हैदराबादमध्ये तुमच्या किती जागा येतात पाहू’, ओवेसींचं भाजपला आव्हान

KCR on Adityanath’s visit says 28th rank state trying to teach lessons to 5th rank state